Google ला कायदेशीर नोटीस; Gemini AI द्वारे युजर्सचा डेटा चोरल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:47 IST2025-11-12T15:25:45+5:302025-11-12T15:47:42+5:30
Gemini AI: तुम्ही Gemini AI वापरता? मग सावधान...

Google ला कायदेशीर नोटीस; Gemini AI द्वारे युजर्सचा डेटा चोरल्याचा आरोप
Gemini AI: आर्टिफिशील इंटेलिजन्स (AI) जगभरात झपाट्याने लोकप्रिय होत असताना, यातील गोपनीयतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google यामुळेच अडचणीत आली आहे. गुगलच्या Gemini AI Assistant द्वारे युजर्सचा डेटा चोरल्याचा गंभीर आरोप कंपनीवर लावण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
कॅलिफोर्नियातील सॅन होजे फेडरल कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार, गूगलने आपल्या एआय टूल जेमिनीच्या मदतीने Gmail, Google Chat आणि Google Meet सारख्या प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा खासगी संवाद आणि डेटा गुप्तपणे ट्रॅक केला जातोय.
याचिकेत म्हटले आहे की, आधी युजर्सना एआय फिचर “टर्न ऑन” करण्याचा पर्याय दिला जात होता. मात्र, ऑक्टोबर 2025 मध्ये कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व अॅप्लिकेशन्समध्ये जेमिनी एआय डिफॉल्टपणे अॅक्टिव्ह केला. याद्वारे युजर्सची पूर्वसंमती न घेता त्यांच्या ई-मेल्स, अटॅचमेंट्स आणि चॅट हिस्ट्रीसारखी खासगी माहिती गूगलने मिळवल्या आरोप करण्यात आला आहे.
युजर्सच्या गोपनीयतेवर गदा
याचिकाकर्त्यांनी असेही म्हटले आहे की, गूगलने जेमिनी “टर्न ऑफ” करण्याचा पर्याय दिला असला तरी, तो गोपनीयता सेटिंग्जच्या आत खोलवर आहे, जिथे सामान्य युजर्सना पोहोचणे अवघड आहे. जोपर्यंत युजर हे टूल हाताने बंद (Manually Deactivate) करत नाही, तोपर्यंत गूगलला त्याच्या संपूर्ण ई-मेल डेटावर प्रवेश राहतो.
याचिकेत नमूद केले आहे की, गूगलने 1967 मध्ये तयार झालेल्या “California Invasion of Privacy Act” चा भंग केला आहे. या कायद्यानुसार, सर्व संबंधित पक्षांची स्पष्ट संमती न घेता खासगी संवादाची नोंद करणे किंवा त्यावर प्रवेश मिळवणे गुन्हा मानला जातो. कोर्टाने गूगलला या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस जारी केली आहे. जर आरोप सिद्ध झाले, तर ही घटना गूगलच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का देऊ शकते आणि एआय डेटा प्रायव्हसीबाबतच्या जागतिक चर्चेला नवे वळण मिळू शकते.