इंटरनेट स्पीड यादीत भारताची घसरण; 'हा' देश ठरला जगात नंबर वन
By देवेश फडके | Updated: January 21, 2021 13:20 IST2021-01-21T13:18:38+5:302021-01-21T13:20:39+5:30
मोबाइल आणि ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड रँकिंगमध्ये भारताची मोठी घसरण झाली आहे. स्पीड टेस्ड ग्लोबल इंडेक्स Ookla ने याबाबत एक अहवाल दिला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

इंटरनेट स्पीड यादीत भारताची घसरण; 'हा' देश ठरला जगात नंबर वन
नवी दिल्ली : मोबाइल आणि ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड रँकिंगमध्ये भारताची मोठी घसरण झाली आहे. स्पीड टेस्ड ग्लोबल इंडेक्स Ookla ने याबाबत एक अहवाल दिला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात भारतातील मोबाइल आणि ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये घसरण झाली आहे.
Ookla च्या एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर मोबाइल इंटरनेटच्या स्पीडमध्ये भारताचा १२९ वा क्रमांक लागतो. तर ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये भारत ६५ व्या स्थानावर आहे. या रँकिंगमध्ये कतारने मोठी झेप घेतली आहे. भारतात मोबाइल इंटरनेट डाउनलोड स्पीड नोव्हेंबर महिन्यात १३.५१ Mbps होता. त्यात घट होऊन डिसेंबर महिन्यात १२.९१ Mbps इतका नोंदवण्यात आला. मात्र, भारताच्या सरासरी अपलोड स्पीड १.४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
भारतात ब्रॉडबँडमध्ये सरासरी डाउनलोडिंग स्पीड ५३.९० Mbps नोंदवला गेला. डिसेंबर महिन्यातील भारतात ब्रॉडबँड अपलोड स्पीड ५०.७५ Mbps होता. या रँकिंगमध्ये भारताचा ६५ वा क्रमांक लागतो. साउथ कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातला मागे टाकून कतार जगातील सर्वाधिक मोबाइल इंटरनेट स्पीड असलेला देश ठरला आहे.
कतारमध्ये मोबाइल डाउनलोडिंग स्पीड सर्वांत जास्त म्हणजेच १७८.०१ Mbps नोंदवला गेला. कतारनंतर १७७.५२ Mbps स्पीडसह संयुक्त अरब अमिरातीचा क्रमांक लागतो. या यादीत दक्षिम कोरिया तिसऱ्या, चीन चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे. ब्रॉडबँड स्पीडच्या यादीत थायलँड प्रथम क्रमांकावर आहे. थायलँडचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड ३०८.३५ Mbps होता. यानंतर सिंगापूर आणि हाँगकाँगचा क्रमांक लागतो. रोमानिया चौथ्या आणि स्विझर्लंड पाचव्या स्थानी आहे.