यूट्यूबवर ५,००० व्ह्यूज मिळाले तर किती कमाई होते? चॅनेल सुरू करण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:14 IST2026-01-06T13:11:23+5:302026-01-06T13:14:12+5:30
जर तुम्हीही व्हिडिओ बनवण्याचा विचार करत असाल, तर ५,००० व्ह्यूजवर नेमके किती पैसे मिळतात आणि यूट्यूबचे अर्थकारण कसे चालते, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

यूट्यूबवर ५,००० व्ह्यूज मिळाले तर किती कमाई होते? चॅनेल सुरू करण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या
आजच्या डिजिटल युगात यूट्यूब हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नसून, कमाईचे एक मोठे माध्यम बनले आहे. भारतात असे अनेक क्रिएटर्स आहेत जे एआय आणि कल्पकतेच्या जोरावर वर्षाला ३८ कोटी रुपयांपर्यंत गल्ला जमवत आहेत. जर तुम्हीही व्हिडिओ बनवण्याचा विचार करत असाल, तर ५,००० व्ह्यूजवर नेमके किती पैसे मिळतात आणि यूट्यूबचे अर्थकारण कसे चालते, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
व्ह्यूजवर नव्हे, तर जाहिरातींवर मिळतात पैसे!
अनेक नवीन क्रिएटर्सना वाटते की व्हिडिओला व्ह्यूज आले की पैसे मिळतात, पण सत्य थोडे वेगळे आहे. यूट्यूब तुम्हाला व्हिडिओच्या व्ह्यूजसाठी नाही, तर त्या व्हिडिओवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या व्ह्यूजसाठी पैसे देते. तुमच्या व्हिडिओला १०,००० व्ह्यूज मिळाले, पण त्यावर एकही जाहिरात दिसली नाही, तर तुमची कमाई शून्य असेल. याउलट, ५,००० व्ह्यूजपैकी जर ३,००० वेळा जाहिरात पाहिली गेली, तर तुम्हाला त्या ३,००० व्ह्यूजचे पैसे मिळतील.
५,००० व्ह्यूजवर किती मिळते रक्कम?
यूट्यूबकडून मिळणारी रक्कम ही तुमचे प्रेक्षक कोणत्या देशातील आहेत, तुमचा विषय काय आहे आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे, यावर अवलंबून असते. साधारणपणे एक अंदाज असा वर्तवला जातो. ५,००० व्ह्यूजवर साधारणपणे २५ डॉलर ते ७५ डॉलर (भारतीय चलनात सुमारे २,००० ते ६,२०० रुपये) पर्यंत कमाई होऊ शकते. ही रक्कम व्हिडिओच्या श्रेणीनुसार (उदा. टेक, फायनान्स किंवा कॉमेडी) कमी-जास्त होऊ शकते.
कमाईचे इतर 'स्मार्ट' मार्ग
केवळ जाहिरातींवर अवलंबून न राहता क्रिएटर्स खालील मार्गांनीही मोठी कमाई करत आहेत:
१. यूट्यूब पार्टनर प्रोग्राम: याद्वारे प्रीमियम सबस्क्रिप्शन फीचा वाटा मिळतो.
२. चॅनेल मेंबरशिप: तुमचे चाहते महिन्याला ठराविक फी देऊन तुमच्या चॅनेलचे खास सदस्य बनू शकतात.
३. स्पॉन्सर्ड कंटेंट: कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात करून मोठी रक्कम घेता येते.
४. एफिलिएट मार्केटिंग: व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उत्पादनांची लिंक देऊन कमिशन मिळवता येते.
५. मर्चेंडाइज: स्वतःचे ब्रँडेड टी-शर्ट, कप किंवा इतर वस्तू विकून कमाई करता येते.
'हे' नियम पाळा!
- कॉपीराईट आणि यूट्यूबच्या धोरणांचे उल्लंघन केल्यास चॅनेल बंद होऊ शकते.
- तुमचे सबस्क्राइबर्स किती वेळ व्हिडिओ पाहतात यावर तुमची रँकिंग ठरते.
- नियमित व्हिडिओ अपलोड केल्याने चॅनेलची 'रीच' वाढते.