हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 09:53 IST2026-01-09T09:53:39+5:302026-01-09T09:53:49+5:30
Voice Activated Banking in Pakistan: पाकिस्तान आपल्या बँकिंग क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलत असून, लवकरच तिथे व्हॉइस-अॅक्टिव्हेटेड बँकिंग अॅप्स लाँच केले जाणार आहेत.

हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार
इस्लामाबाद : ज्या देशाच्या ६३ टक्के तरुणाईने आजपर्यंत कधीच शाळेचे तोंड पाहिले नाही, त्या पाकिस्तानने आपल्या अडाणी जनतेसाठी भारताच्या प्रगत आणि सुरक्षित युपीआय सिस्टीमपेक्षाही फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली आहे. एखाद्याला पैसे पाठवायचे असतील तर पाकिस्तानी लोकांना बोटांनी टाईप करण्याची किंवा विशिष्ट मेनू शोधण्याची गरज राहणार नाही. यावर पाकिस्तानी लोकच तोंडसुख घेऊ लागले असून याला प्रगती म्हणायचे कंगालीचा नवा मार्ग असा सवाल करू लागले आहेत.
पाकिस्तान आपल्या बँकिंग क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलत असून, लवकरच तिथे व्हॉइस-अॅक्टिव्हेटेड बँकिंग अॅप्स लाँच केले जाणार आहेत. या सुविधेमुळे ग्राहक केवळ बोलून आपले बँकिंग व्यवहार पूर्ण करू शकणार आहेत. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) वर आधारित आहे. याद्वारे ग्राहक आपल्या आवाजाचा वापर करून बॅलन्स तपासणे, पैसे ट्रान्सफर करणे किंवा बिले भरणे यांसारखी कामे करू शकतील. हे फिचर विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांना स्मार्टफोन वापरण्यात तांत्रिक अडचणी येतात किंवा जे लोक दृष्टिहीन आहेत.
सुरक्षेचे काय?
अनेक युजर्सना आवाजाद्वारे बँकिंग करताना सुरक्षेची भीती वाटू शकते. मात्र, हे अॅप्स व्हॉइस बायोमेट्रिक्स तंत्रज्ञानाचा वापर करतील. प्रत्येक व्यक्तीच्या आवाजाचा ठसा हा वेगळा असतो, त्यामुळे हे तंत्रज्ञान फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी इतकेच सुरक्षित मानले जात आहे. टाईप करण्यापेक्षा बोलणे सोपे आणि जलद असल्याने वेळ वाचेल. जे लोक जास्त शिकलेले नाहीत, तेही केवळ बोलून बँक खाते हाताळू शकतील.
पाकिस्तानमधील काही आघाडीच्या बँकांनी यावर काम सुरू केले असून, येत्या काही महिन्यांत हे फिचर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.