सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:58 IST2025-11-05T13:57:54+5:302025-11-05T13:58:59+5:30
Google Space Project: काय आहे गूगलचा ‘सन कॅचर’ प्रोजेक्ट? जाणून घ्या...

सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
Google Space Project: गुगलने AI क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेतली आहे. कंपनीने आपला ‘Project Sun Catcher’ या अत्याधुनिक प्रकल्पाचा पहिला यशस्वी प्रयोग पूर्ण केल्याची माहिती गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी दिली. या प्रकल्पाचा उद्देश लो अर्थ ऑर्बिट (पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत) सौरऊर्जेवर चालणारे AI कंप्युटिंग सिस्टम आणि डेटा सेंटर उभारणे आहे.
‘सन कॅचर’चा उद्देश
सुंदर पिचाईंच्या मते, हा प्रकल्प गुगलच्या सर्वात महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञान उपक्रमांपैकी एक आहे. सध्या जगभरात कंपन्या जमिनीवर आणि समुद्राखाली डेटा सेंटर उभारत आहेत, परंतु गुगल आता थेट अवकाशात AI कंप्युटिंग सिस्टम तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रकल्पाचा मुख्य हेतू सूर्यापासून थेट ऊर्जा घेऊन तिला AI कंप्युटिंगसाठी वापरणे, ज्यामुळे पारंपरिक इंधनावर अवलंबित्व कमी होईल.
यशस्वी टेस्टिंग: रेडिएशनमध्येही चिप्स सुरक्षित
गुगलने लो अर्थ ऑर्बिटमधील रेडिएशन कंडिशन्स लक्षात घेऊन एक प्रयोग केला. या टेस्टिंगमध्ये कंपनीने Trillium-generation Tensor Processing Units (TPUs), म्हणजेच AI साठी खास बनवलेल्या चिप्स वापरल्या. सुंदर पिचाई म्हणाले, “या TPU चिप्सनी रेडिएशनच्या तीव्र परिस्थितीतही कोणतीही हानी न होता उत्कृष्ट कामगिरी केली.” ही चाचणी यशस्वी ठरल्याने असे संकेत मिळाले आहेत की, गुगलचे हार्डवेअर अवकाशातील तीव्र तापमान आणि रेडिएशनलाही तोंड देऊ शकेल.
Our TPUs are headed to space!
— Sundar Pichai (@sundarpichai) November 4, 2025
Inspired by our history of moonshots, from quantum computing to autonomous driving, Project Suncatcher is exploring how we could one day build scalable ML compute systems in space, harnessing more of the sun’s power (which emits more power than 100… pic.twitter.com/aQhukBAMDp
TPU म्हणजे काय?
TPU म्हणजे Tensor Processing Unit, जे गुगलने खास AI कामासाठी विकसित केलेली प्रोसेसर चिप आहे. ही चिप पारंपरिक CPU किंवा GPU पेक्षा जलद आणि ऊर्जा-कार्यक्षम आहे. ती मोठ्या प्रमाणातील मशीन लर्निंग आणि डेटा प्रोसेसिंगसाठी वापरली जाते.
सौरऊर्जेवर आधारित कंप्युटिंग सिस्टम
या प्रकल्पात सौरऊर्जेला केंद्रस्थानी ठेवले गेले आहे. सूर्याच्या ऊर्जेचा वापर करुन अवकाशातील AI कंप्युटिंग नेटवर्कला वीज पुरवली जाईल. ही ऊर्जा सोलर पॅनेल्सच्या माध्यमातून गोळा केली जाईल. त्यानंतर ती थेट लो अर्थ ऑर्बिटमध्ये स्थापित मोठ्या AI सिस्टम्सना ट्रान्सफर केली जाईल. यामुळे पृथ्वीवरील डेटा सेंटर्सवर असलेला ताण आणि ऊर्जेवरील प्रदूषणाचा भार दोन्ही कमी होतील.
या प्रकल्पाची गरज का भासली?
AI ची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि पुढील पाच वर्षांत AI डेटा सेंटरची क्षमता पाचपट वाढवावी लागू शकते. डेटा सेंटर चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. AI मॉडेल्स, जसे ChatGPT, Gemini, Claude, यांना प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते. केवळ सर्व्हर 60% वीज वापरतात, तर कूलिंग सिस्टम 7 ते 30% वापरतात. सध्या ही ऊर्जा प्रामुख्याने कोळसा, गॅस आणि डिझेलवर आधारित आहे, ज्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत Google चे अंतराळातील डेटा सेंटर पृथ्वीवरील वीज वाचवण्यासाठी एक गेम-चेंजिंग पाऊल ठरू शकते.
मूनशूट प्रोजेक्टकडून प्रेरणा
गुगलला या प्रकल्पाची प्रेरणा “Moonshot Project” (Alphabet च्या X Division) कडून मिळाली आहे. ही डिव्हिजन अशा कल्पनांवर काम करते, ज्या सध्याच्या कल्पनाशक्तीच्या मर्यादेपलीकडे असतात, म्हणजेच तंत्रज्ञानाच्या नव्या सीमेवर प्रयोग करण्याचे केंद्र.
2027 पर्यंत दोन उपग्रह लॉन्च
सुंदर पिचाईंच्या म्हणण्यानुसार, जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले, तर 2027 च्या सुरुवातीपर्यंत गुगल “Planet” कंपनीच्या सहकार्याने दोन प्रोटोटाइप सॅटेलाइट्स लॉन्च करेल. यानंतर हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विस्तारला जाईल.