Apple Malware: जगातील सर्वात महत्त्वाच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅपलवर एका माजी कर्मचाऱ्याने गंभीर आरोप केला आहे. ॲपल आपल्या जुन्या आयफोन मॉडेल्समध्ये मुद्दाम मालवेअर पाठवून तो स्लो करतो, जेणेकरून वैतागलेले ग्राहक नवीन आयफोन खरेदी करतील, असा दावा या माजी सॉफ्टवेअर इंजिनीअरने केला आहे. या दाव्यामुळे जगभरातील कोट्यवधी आयफोन युजर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ॲपलच्या एका माजी सॉफ्टवेअर इंजिनीअरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा खळबळजनक दावा केला. तिच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कंपनी बाजारात नवीन आयफोन लाँच करते, तेव्हा जुन्या डिव्हाईससाठी सॉफ्टवेअर अपडेट जारी केले जातात. या अपडेट्समध्ये छुप्या पद्धतीने मालवेअर पाठवले जातात, ज्यामुळे फोनचा परफॉर्मन्स मंदावतो. यामुळे युजर्सना आपला जुना फोन खराब झाल्याचे वाटते आणि ते नवीन मॉडेलकडे वळतात.
२०१७ मधील 'बॅटरीगेट' प्रकरणाची आठवण
ॲपलवर अशा प्रकारचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१७ मध्ये iOS 10.2.1 अपडेटनंतर आयफोन ६ वापरणाऱ्या युजर्सनी बॅटरी अचानक डिस्चार्ज होण्याच्या आणि फोन बंद पडण्याच्या तक्रारी केल्या होत्या. तेव्हाही असाच आरोप झाला होता की, कंपनी मुद्दाम डिव्हाइस थ्रोटल करत आहे. या प्रकरणी ॲपलला फ्रान्सने २५ दशलक्ष युरो आणि इटलीने १० दशलक्ष युरोचा दंड ठोठावला होता. कंपनीला अमेरिकेतील युजर्सना ५०० दशलक्ष डॉलर्स आणि अटॉर्नी जनरल्सना ११३ दशलक्ष डॉलर्सची नुकसानभरपाई द्यावी लागली होती. हा दंड फोन स्लो करण्यासाठी नव्हते, तर अपडेटमध्ये नेमकं काय बदल केले आहेत, याची माहिती ग्राहकांपासून लपवून ठेवले त्यासाठी होता.
फोन अपडेटनंतर स्लो का होतो?
तज्ञांच्या मते, यामागे केवळ षडयंत्र नसून तांत्रिक कारणेही असू शकतात. आयफोनमधील लिथियम-आयन बॅटरीची क्षमता साधारण ३ वर्षांनंतर ८० टक्क्यांपर्यंत खाली येते. तसेच जेव्हा नवीन सॉफ्टवेअर अपडेट येते, तेव्हा प्रोसेसरला अचानक जास्त ऊर्जेची गरज भासते. जुनी झालेली बॅटरी हा लोड सहन करू शकत नाही. फोन अचानक ३० टक्क्यांवर बंद पडू नये, म्हणून सिस्टिम प्रोसेसरचा वेग कमी करते, ज्याला थ्रोटलिंग म्हणतात. यामुळे फोन हँग किंवा स्लो झाल्यासारखा वाटतो.
दुसरी बाजू
एकीकडे हे आरोप होत असताना, दुसरीकडे अँड्रॉइडच्या तुलनेत आयफोन जास्त काळ टिकतात, असेही मानले जाते. अनेक युजर्स आजही ५-६ वर्षे जुने आयफोन ११ किंवा १२ वापरत आहेत. स्वतः कंपनीचे सीईओ टिम कुक यांनीही म्हटले आहे की, ग्राहकांनी दरवर्षी फोन बदलण्याची गरज नाही. नवीन चिपसेट आणि जास्त रॅममुळे जुन्या फोनच्या तुलनेत नवीन फोन वेगवान वाटणे स्वाभाविक आहे.
दरम्यान, ॲपलने सध्या या माजी कर्मचाऱ्याच्या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सोशल मीडियावर युजर्सनी कंपनीच्या या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कंपन्या खरंच मुद्दाम जुन्या वस्तू खराब करण्याचे काम करतात का? हा प्रश्न पुन्हा विचारला जात आहे.
Web Summary : Ex-employee alleges Apple slows older iPhones via malware, prompting upgrades. Past throttling controversies and battery issues fuel user concerns. Technical factors like battery degradation also contribute to performance decline.
Web Summary : पूर्व कर्मचारी का आरोप है कि Apple पुराने iPhone को जानबूझकर धीमा करता है ताकि बिक्री बढ़ाई जा सके। बैटरी की समस्या और अन्य तकनीकी कारण भी हैं जो प्रदर्शन को प्रभावित करते हैं।