आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या आणि लखनौ सुपर जायंट्सचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये निकोलस पूरन हा क्रुणाल पांड्याची कॉलर पकडताना दिसला. त्यामुळे या दोघांमध्ये मैदानात वाद झाला, अशा चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या. मात्र, या चर्चांमागचे सत्य आता स्वतः दोन्ही खेळाडूंनीच स्पष्ट केले आहे. मैदानावरील तो क्षण हा कोणत्याही वादाचा नसून निव्वळ मैत्रीपूर्ण मस्करीचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्रुणाल पांड्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर निकोलस पूरनसोबतचा एक फोटो शेअर करत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “कोणताही वाद नाही, केवळ प्रेम! माझा भाऊ निकोलस पूरनला आयपीएलमध्ये १०० सामने पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. मला तुझा अभिमान आहे. भावा, तुझ्याकडून अजूनही खूप काही पाहायला मिळणार आहे. असो, तो ‘बाउन्सर’ कसा वाटला?” क्रुणालच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. विशेष म्हणजे, निकोलस पूरननेही या पोस्टवर प्रतिक्रिया देत दोघांमधील मैत्री अधोरेखित केली. पूरनने कमेंटमध्ये लिहिले की, “मित्रांनो, इथे केवळ प्रेमच आहे. तो माझ्या सर्वोत्तम मित्रांपैकी एक आहे.”
सोशल मीडियावरील चर्चांना पूर्णविराम
मैदानावरील एका छोट्याशा क्षणाला सोशल मीडियावर वेगळे वळण मिळाले होते. मात्र, क्रुणाल पांड्या आणि निकोलस पूरन यांनी स्वतः पुढे येत चाहत्यांना खरी परिस्थिती सांगितली. त्यामुळे हा कथित ‘वाद’ नसून दोन जवळच्या मित्रांमधील निव्वळ मजेशीर क्षण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जुनी मैत्री पुन्हा चर्चेत
क्रुणाल पांड्या आणि निकोलस पूरन यांनी आयपीएल २०२३ आणि २०२४ हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून एकत्र खेळले आहेत. त्या काळात दोघांमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. मैदानावर त्यांच्यात अनेकदा मजेशीर संवाद आणि हलक्या-फुलक्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे व्हायरल झालेला व्हिडीओदेखील याच मैत्रीपूर्ण नात्याचा भाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सामन्यात लखनौचा थरारक विजय
दरम्यान, या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने आरसीबीवर ९ धावांनी रोमांचक विजय मिळवला. लखनौकडून मिचेल मार्शने तुफानी फलंदाजी करत अवघ्या ५६ चेंडूंमध्ये १११ धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या या शतकामुळे लखनौने मोठी धावसंख्या उभारली. विजयासाठी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून कर्णधार रजत पाटीदार, टीम डेव्हिड आणि क्रुणाल पांड्या यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांची झुंज अपुरी पडली आणि संघाला अखेरीस पराभव स्वीकारावा लागला.
Web Summary : Viral video sparked rumors of a feud between Krunal Pandya and Nicholas Pooran. Both players clarified it was friendly banter. Krunal congratulated Pooran on his IPL milestone. Pooran reciprocated, reaffirming their strong friendship. Lucknow Super Giants secured a thrilling victory in the match.
Web Summary : वायरल वीडियो से क्रुणाल पांड्या और निकोलस पूरन के बीच झगड़े की अफवाहें उड़ीं। दोनों खिलाड़ियों ने स्पष्ट किया कि यह दोस्ताना मजाक था। क्रुणाल ने पूरन को आईपीएल में मील का पत्थर प्राप्त करने पर बधाई दी। पूरन ने भी अपनी गहरी दोस्ती की पुष्टि की। मैच में लखनऊ सुपर जायंट्स ने रोमांचक जीत हासिल की।