अमेरिका नाही, 'या' देशात आहे सर्वात वेगवान इंटरनेट? भारत कितव्या स्थानावर? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 14:31 IST2026-02-16T14:29:32+5:302026-02-16T14:31:54+5:30
Fastest Internet:मोबाइल आणि ब्रॉडबँड इंटरनेटमध्ये कोण अव्वल?

अमेरिका नाही, 'या' देशात आहे सर्वात वेगवान इंटरनेट? भारत कितव्या स्थानावर? जाणून घ्या...
Fastest Internet: आजच्या डिजिटल युगात व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग, क्लाउड सेवा आणि रिमोट वर्कसाठी इंटरनेटचा वेग अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा मिळते. मात्र, अल्ट्रा-फास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या शर्यतीत सध्या दोन देश आघाडीवर आहेत. यातील एक मोबाइल इंटरनेटमध्ये, तर दुसरा फिक्स्ड (होम) ब्रॉडबँडमध्ये अव्वल स्थानावर आहे.
सर्वात वेगवान मोबाइल इंटरनेट कुठे?
मोबाइल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत संयुक्त अरब अमिराती (UAE) जगात अव्वल स्थानावर आहे. देशातील सरासरी मोबाइल डाउनलोड स्पीड 691 Mbps पेक्षा अधिक आहे. या वेगामुळे युजर्स कोणत्याही बफरिंगशिवाय 4K व्हिडीओ स्ट्रीम करू शकतात, काही सेकंदांत हाय-डेफिनिशन चित्रपट डाउनलोड करू शकतात आणि जवळपास तत्काळ क्लाउड अॅक्सेसचा अनुभव घेऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, UAE मधील वेगवान 5G रोलआउट आणि अत्याधुनिक टेलिकॉम पायाभूत सुविधांमुळे हा देश या शिखरावर पोहोचला आहे.
सिंगापूर फिक्स्ड ब्रॉडबँडचा बादशाह
होम ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत सिंगापूर जगात नंबर एक ठरला आहे. देशातील सरासरी फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड सुमारे 410 Mbps आहे. या यशामागे देशभरात उपलब्ध असलेले 99 टक्के फायबर-ऑप्टिक कव्हरेज हे मुख्य कारण मानले जाते. सिंगापूरच्या दीर्घकालीन स्मार्ट नेशन धोरणांतर्गत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून, त्यामुळे स्थिर आणि अतिवेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी शक्य झाली आहे.
जपानचा प्रयोगशाळेतील विक्रम
सध्या व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध नसला, तरी जपानने इंटरनेट स्पीडच्या बाबतीत एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. जपानी शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत 1.02 पेटाबिट्स प्रति सेकंद इतका इंटरनेट वेग साध्य केला. सोप्या भाषेत सांगायचे तर, या वेगाने सैद्धांतिकदृष्ट्या काही सेकंदांत संपूर्ण नेटफ्लिक्स लायब्ररी डाउनलोड करणे शक्य आहे. मात्र, ही स्पीड अद्याप देशात रोलआउट झालेली नाही.
टॉप रँकिंगमधील इतर देश
मोबाइल इंटरनेट:
कतार - सरासरी 573 Mbps (दुसरे स्थान)
फिक्स्ड ब्रॉडबँड:
चिली - सुमारे 357 Mbps
फ्रान्स - सुमारे 349 Mbps
भारताची स्थिती काय?
देशभरात 5G सेवा सुरू झाल्यानंतर भारताने इंटरनेट स्पीडमध्ये लक्षणीय सुधारणा दाखवली आहे. देशातील सरासरी मोबाइल इंटरनेट स्पीड 130 ते 136 Mbps आहे. यासह, भारत जागतिक क्रमवारी अंदाजे 26 ते 30व्या स्थानावर आहे. भारत जरी UAE आणि सिंगापूरपेक्षा मागे असला, तरी वेगाने होत असलेला डिजिटल विस्तार, 5G नेटवर्कचा प्रसार आणि वाढती गुंतवणूक पाहता, येत्या काही वर्षांत ही दरी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.