पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:43 IST2025-10-01T13:42:41+5:302025-10-01T13:43:32+5:30
ई-कॉमर्स कंपन्या हुशारीने ५० हजारचा फोन २५ हजारमध्ये देण्याचा, म्हणजे ५०% डिस्काऊंट देण्याचा दावा करतात. पण सत्य काही वेगळंच आहे.

पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
Amazon आणि Flipkart वर सध्या फेस्टिव्ह सेल सुरू आहे. यामध्ये भरपूर डील्स आणि डिस्काऊंट पाहायला मिळत आहेत. परंतु बऱ्याचदा लोक डिस्काऊंटच्या नावाखाली महागड्या वस्तू ऑनलाईन खरेदी करतात. कारण तुम्हाला जो डिस्काऊंट दाखवण्यात येतो ती खरंतर त्याची एमआरपी असते. कोणतंही प्रोडक्ट विक्रीसाठी येताच एमआरपीपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होतं. उदाहरणार्थ जर स्मार्टफोनची एमआरपी ५० हजार असेल तर विक्रीसाठी येताच स्मार्टफोन ४५ हजारमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता असते.
ई-कॉमर्स कंपन्या हुशारीने ५० हजारचा फोन २५ हजारमध्ये देण्याचा, म्हणजे ५०% डिस्काऊंट देण्याचा दावा करतात. पण सत्य काही वेगळंच आहे. इतकंच नाही तर तुम्हाला अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर टायमर देखील दिसेल. हा काउंटडाउन टायमर प्रत्यक्षात ग्राहकांना असा विचार करायला लावण्यासाठी बसवला जातो की जर त्यांनी ते आत्ताच खरेदी केलं नाही तर नंतर प्रोडक्ट अधिक महाग होईल. बऱ्याचदा, तुम्ही एखादं प्रोडक्ट खरेदी करता आणि काही दिवसांनीही ते त्याच किमतीत किंवा अगदी स्वस्तात उपलब्ध होतं.
ऑनलाईन विक्रीमध्ये फसवणूक
ऑनलाईन विक्रीमध्ये फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात होते. लोकांना अनेकदा बनावट वेबसाईट्सच्या लिंक्स पाठवल्या जातात. कोणत्याही प्रोडक्टवर सर्वोत्तम डील मिळविण्यासाठी, तुम्हाला थोडा रिसर्च करावा लागेल. सर्वात आधी, तीन किंवा चार प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइटना भेट द्या आणि प्रोडक्टची किंमत तपासा आणि त्याची डिस्काऊंट किंमत देखील समजून घ्या.
ऑफलाईन स्टोअर सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर
ई-कॉमर्स वेबसाईट्स सामान्यत: फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त कार्ड ऑफर देतात. नो-कॉस्ट ईएमआयवर देखील डिस्काऊंट उपलब्ध आहेत. एकूण डिस्काउंटची नोंद घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. क्रोमा, विजय सेल्स आणि रिलायन्स डिजिटल सारखे ऑफलाईन स्टोअर देखील सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर देतात. याशिवाय, इतर ऑफलाईन रिटेल स्टोअर्स स्मार्टफोन आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवर उत्तम डील देतात. एसी, टीव्ही, रेफ्रिजरेटर, कूलर आणि वॉशिंग मशीन हे आजकाल ऑफलाईन स्टोअर्समध्ये खूपच स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत.
बेस्ट डील कोणती?
ऑनलाईन मार्केटप्लेसचा रिसर्च केल्यानंतर, तुम्ही ऑफलाईन रिटेल स्टोअर्सना भेट द्या. स्टोअरमधील प्रोडक्टबद्दल चौकशी करा आणि ऑनलाईन डिस्काऊंटच्या किंमतीबद्दल त्यांना सांगा. अनेकदा, ऑफलाईन स्टोअर्स म्हणतात की, ऑनलाईन खरेदी केलेली प्रोडक्ट बनावट आहेत आणि वॉरंटी क्लेम करताना कठीण होतं. पण प्रत्यक्षात असं नाही.
ऑफलाईन रिटेल स्टोअरमध्ये जा आणि त्यांना ऑनलाईन ऑफरबद्दल माहिती द्या. अनेक रिटेल स्टोअर्स तुम्हाला ऑनलाईनपेक्षा थोड्या कमी किमतीत प्रोडक्ट देतील. शिवाय ऑफलाईन स्टोअर्स तुम्हाला विविध भेटवस्तू देखील देतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही फोन खरेदी करत असाल, तर तुम्ही मोफत टेम्पर्ड ग्लास आणि कव्हर मागू शकता.
ऑफलाईन स्टोअर्स, विशेषतः फेस्टिव्ह सीझनमध्ये काही मनोरंजक डील देतात. तुम्ही ऑनलाईन उपलब्ध असलेल्या कार्ड ऑफरचा दावा करू शकता. तुम्हाला ऑफलाईन रिटेल स्टोअर्समध्ये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील मिळू शकतो.
जुने प्रोडक्ट एक्सचेंज
अनेक ऑफलाईन रिटेल स्टोअर्स जुने प्रोडक्ट देखील खरेदी करतात. विशेषतः, अनेक स्टोअर्स तुमच्याकडून चांगल्या किमतीत जुने स्मार्टफोन खरेदी करतील. म्हणून, कॅशिफाय किंवा इतर ट्रेड-इन प्लॅटफॉर्म तपासल्यानंतर, तुम्ही तुमचे जुने गॅझेट एक्सचेंज करण्यासाठी ऑफलाईन रिटेल स्टोअर्समध्ये देखील जाऊ शकता. तुमचा जुना फोन ऑनलाईन सर्व्हिसपेक्षा ऑफलाईन जास्त किमतीत विकला जाईल.