"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:09 IST2025-11-18T18:07:20+5:302025-11-18T18:09:31+5:30
Sundar Pichai on Artificial Intelligence: जगभरात एआयचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. वेगवेगळ्या कामांसाठी एआयची मदत घेतली जात आहे. एआयचा वापर करणाऱ्यांना सुंदर पिचाई यांनी एक सावधगिरीचा इशारा दिला आहे.

"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
तुम्ही तुमच्या दैनंदिन कामासाठी, ऑफिसमधील कामासाठी एआयचा वापर करता का, एआयची मदत घेता का? पण त्याचा वापर करत असताना तुम्ही पूर्णपणे त्याच्यावरच विसंबून असता का? एआयने दिलेल्या माहिती सत्य आहे, असे समजून वापरता का? असे असेल, तर तुम्ही चूक करत आहात. हे खुद्द गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनीच म्हटले आहे. एआय तुम्हाला जे काही सांगत आहे, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून नका, असा सावधगिरीचा इशारा पिचाईंनी दिला आहे.
बीबीसीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये सीईओ सुंदर पिचाई यांनी एआयकडून पुरवल्या जाणाऱ्या माहितीबद्दलचा धोका अधोरेखित केला.
सुंदर पिचाई एआयबद्दल काय बोलले?
सुंदर पिचाई म्हणाले, "एआय मॉडेलला चुका करण्याची सवय आहे. त्यामुळे लोकांनी एआयकडून दिलेली माहिती इतर अन्य स्त्रोतांकडून पडताळून घ्यावी आणि नंतरच वापरली पाहिजे."
"माहितीची प्रणालीमध्ये विविधता यावी आणि ती अधिक समृद्ध व्हावी, हीच गोष्ट यातून अधोरेखित होत आहे. जेणेकरून लोक फक्त एआय तंत्रज्ञानावरच अवलंबून राहू नयेत", असे मत त्यांनी मांडले.
एआयमधील गुंतवणुकीबद्दल पिचाईंचा इशारा काय?
सुंदर पिचाई यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा सिलिकॉन व्हॅली आणि इतर ठिकाणी सांशकता व्यक्त केली जात आहे की, एआय हा एक फुगा तर ठरणार नाही. गेल्या काही महिन्यात एआय आधारित तंत्रज्ञान कंपन्यांचे मूल्य वाढले आहे आणि अनेक कंपन्या या नव्याने वाढत असलेल्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.
सुंदर पिचाई यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, एआयचा फुगा फुटला तर त्याचा परिणाम गुगलवर होणार नाही का? त्यावर पिचाई म्हणाले की, "कंपनीला अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. पण, मला असे वाटत नाही की, कोणतीही कंपनी यामुळे पूर्णपणे सुरक्षित होईल. आम्ही पण नाही आहोत."