सायबर फ्रॉडला लगाम! अमेरिकन कंपनीच्या मदतीने Airtel भारतात AI रिसर्च सेंटर उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 18:58 IST2026-02-21T18:58:13+5:302026-02-21T18:58:55+5:30
राजधानी दिल्लीत आयोजित AI समिटमध्ये भागीदारीची घोषणा!

सायबर फ्रॉडला लगाम! अमेरिकन कंपनीच्या मदतीने Airtel भारतात AI रिसर्च सेंटर उभारणार
Airtel : भारतामध्ये वाढत असलेल्या सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी एअरटेलने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने अमेरिकेतील AI सिक्युरिटी प्लॅटफॉर्म Zscaler सोबत भागीदारीची घोषणा केली असून, या सहकार्याअंतर्गत भारतामध्ये AI आणि सायबर थ्रेट रिसर्च सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.
AI समिटमध्ये भागीदारीची घोषणा
दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित AI समिटमध्ये एअरटेलने आपल्या AI थ्रेट मॉडेलचे सादरीकरण केले. त्याचवेळी कंपनीने अधिकृत X (ट्विटर) हँडलवरून या भागीदारीची माहिती दिली. एअरटेलच्या मते, हा उपक्रम मल्टी-स्टेकहोल्डर डिजिटल इनिशिएटिव्ह असून, त्याचा उद्देश राष्ट्रीय स्तरावर सायबर रेसिलिएन्स मजबूत करणे आहे.
अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि डिजिटल युजर्सवर लक्ष
या AI रिसर्च सेंटरच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, टेलिकम्युनिकेशन, बँकिंग, ऊर्जा क्षेत्र आणि डिजिटल युजर्स यांना सायबर हल्ल्यांपासून संरक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.
Airtel and zscaler have joined forces to launch the AI & Cyber Threat Research Center — India
— Bharti Airtel (@airtelnews) February 20, 2026
अमेरिकन कंपनी Zscalerसोबत हातमिळवणी
एअरटेलने स्पष्ट केले की, या रिसर्च सेंटरसाठी Zscalerची ThreatLabz India संशोधन टीम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही टीम दरमहा लाखो सायबर घुसखोरीचे (Infiltration) प्रयत्न अभ्यासते. हे प्रयत्न प्रादेशिक भू-राजकीय घडामोडींशी संबंधित असून, अनेक वेळा भारतीय संस्था आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स लक्ष्य केले जातात.
ThreatLabzच्या अहवालानुसार, भारतातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रावर 1.2 मिलियन (12 लाख) सायबर हल्ल्यांचे प्रयत्न झाले असून, हे प्रयत्न 20,000 वेगवेगळ्या स्रोतांमधून आले आणि 58 भारतीय डिजिटल संस्थांना लक्ष्य केले.
एअरटेल आणि Zscalerची प्रतिक्रिया
एअरटेलचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट गोपाल विट्ठल म्हणाले, AI रिसर्च सेंटरमुळे लोक अधिक सुरक्षितपणे डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करू शकतील. संशोधनावर आधारित प्रतिबंधात्मक यंत्रणांमुळे सायबर धोके आधीच ओळखून थांबवता येतील.
तर Zscalerचे CEO जय चौधरी म्हणाले, भारतामध्ये AI आणि सायबर थ्रेट रिसर्च सेंटर उभारल्याने देशाला एक मजबूत सिक्युरिटी क्लाउड मिळेल, जो सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राला सायबर हल्ल्यांपासून वाचवेल.
AI डिटेक्शन टूलमध्ये एअरटेल आघाडीवर
दरम्यान, एअरटेलने यापूर्वीच कॉल आणि मेसेजद्वारे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी AI डिटेक्शन टूल आपल्या नेटवर्कमध्ये सुरू केले आहे. हे टूल फसव्या कॉल्स आणि मेसेजेस नेटवर्क लेव्हलवरच ओळखते, युजर्सना Spam किंवा फ्रॉडची आधीच चेतावणी देते. एअरटेलनंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही अशीच साधने वापरण्यास सुरुवात केली आहे.