ट्विटर चिमणीबाबत मोठी बातमी आली; लिलावात मिळाली एवढी किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 19:06 IST2025-03-23T19:05:55+5:302025-03-23T19:06:55+5:30
सोशल मीडियात क्रांतीकारी ठरलेल्या ट्विटरच्या ब्लू बर्डला नवा मालक मिळाला आहे. हा निळ्या पक्षाचा लोगो जो इतिहास बनला होता त्याचा लिलाव झाला आहे.

ट्विटर चिमणीबाबत मोठी बातमी आली; लिलावात मिळाली एवढी किंमत...
गेल्या काही वर्षांपासून प्रचलित असलेले ट्विट, ट्विटर आणि त्याची चिमणी या तिन्ही गोष्टी अब्जाधीश एलन मस्क यांनी हद्दपार केल्या आहेत. मस्कनी ट्विटर विकत घेत त्याचे आधी नामांतर केले, नंतर लोगो बदलला आता हे ट्विटर मुळात ट्विटर राहिले नाही, तसेच कोणी काही अपलोड केले की त्याला ट्विट केले असे म्हटले जात होते, त्याला आता पोस्ट म्हटले जात आहे. ट्विटरला आता एक्स असे म्हटले जात आहे. अशातच चिमणीबाबत मोठी बातमी आली आहे.
सोशल मीडियात क्रांतीकारी ठरलेल्या ट्विटरच्या ब्लू बर्डला नवा मालक मिळाला आहे. हा निळ्या पक्षाचा लोगो जो इतिहास बनला होता त्याचा लिलाव झाला आहे. एका व्यक्तीने हा लोगो 34,375 अमेरिकी डॉलर (28.5 लाख रुपये) ना विकत घेतला आहे. मस्कनी 'X' असे रिब्रँड करत हा लोगो हटविला होता. एवढेच नाही तर ट्विटरच्या मुख्यालयावरूनही ही चिमणी काढून टाकण्यात आली होती.
"दुर्मिळ आणि संग्रहणीय वस्तू" लिलाव करणाऱ्या आरआर ऑक्शन कंपनीने याचा लिलाव केला आहे. २५४ किलो वजनाचा आणि १२ फूट बाय ९ फूट लांबीचा हा बोर्ड ३४,३७५ अमेरिकन डॉलर्सना विकला गेला आहे. या खरेदीदाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मस्कनी आधीच्या ट्विटर मुख्यालयातील इतर अनेक गोष्टींचा लिलाव केला होता, ज्यामध्ये साइन बोर्ड, स्मृतिचिन्हे, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि अगदी ऑफिस फर्निचरचाही समावेश होता. आता या लोगोचाही लिलाव झाला आहे.
याचबरोबर सीलबंद असलेल्या पहिल्या पिढीतील ४ जीबी आयफोनचाही लिलाव करण्यात आला आहे. याची किंमत ८७,५१४ अमेरिकन डॉलर्स एवढी लावण्यात आली आहे. Apple I संगणक (सर्व अॅक्सेसरीजसह) 375,000 डॉलरमध्ये विकला गेला. १९७६ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी स्वाक्षरी केलेला अॅपल संगणक कंपनीचा चेक १,१२,०५४ अमेरिकन डॉलर्सला विकला गेला.