लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारताने ‘विक्रम ३२०१’ हा पूर्णपणे स्वदेशी ३२-बिट मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात यश मिळविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) डिझाइन आणि विकसित केलेली ही चिप म्हणजे भारताचा डीप-स्पेस (अत्यंत प्रतिकूल वातावरणात वापरण्यायोग्य) मायक्रोप्रोसेसर असून, ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेतील ही एक मोठी झेप मानली जात आहे. ही चिप अवकाश मोहिमांसाठी तयार करण्यात आली आहे.
या चिपचे सेमिकाॅन इंडिया २०२५ या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हेही उपस्थित होते.
कल्पना ३२०१, इतर स्वदेशी डिव्हाइसेस : आणखी चार स्वदेशी उपकरणांचेही सेमिकाॅन इंडिय़ा २०२५मध्ये अनावरण झाले. यामध्ये री-कॉन्फिगरेबल डेटा ॲक्विझिशन सिस्टीम, रिले ड्रायव्हर आयसी, आणि मल्टी-चॅनल लो ड्रॉप-आउट रेग्युलेटर आयसी यांचा समावेश आहे. ‘कल्पना ३२०१’ नावाचा ३२-बिट एसपीएआरसी व्ही८ आरआयएससी मायक्रोप्रोसेसरही सादर करण्यात आला.
१८० नॅनोमीटर सीएमओएस तंत्रज्ञानावर आधारित चिप
विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) आणि सेमीकंडक्टर लॅब (एससीएल) यांनी एकत्र येऊन ही चिप विकसित केली आहे. ही १८० नॅनोमीटर सीएमओएस तंत्रज्ञानावर आधारित आहे. या चिपचा पहिला बॅच पीएसएलव्ही-सी६० मिशन दरम्यान पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल (पीओइएम-४) मध्ये चाचणीसाठी वापरला गेला होता. या चाचणीत चिपने मिशन मॅनेजमेंट कॉम्प्युटरला शस्वीपणे ऊर्जा पुरवली. त्यामुळे तिची उपयुक्तता सिद्ध झाली.
विक्रम चिपची वैशिष्ट्ये नेमकी काय?
- ३२-बिट आर्किटेक्चर : ही चिप पूर्वीच्या १६-बिट ‘विक्रम १६०१’ चिपच्या तुलनेत अधिक प्रगत आहे.
- ६४-बिट फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स : ही सुविधा जटिल गणिती गणनेसाठी उपयुक्त ठरते, विशेषतः अवकाश मोहिमा आणि वैज्ञानिक संशोधनात ती उपयोगी आहे.
स्वदेशी सॉफ्टवेअर टूल्स
इस्रोने या चिपसाठी स्वतःचे कंपायलर, असेम्बलर, लिंकर, सिम्युलेटर आणि इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट (आयडीइ) तयार केले आहेत. ही चिप संपूर्णपणे भारतात डिझाइन आणि तयार करण्यात आलेली आहे.ही इतकी मजबूत आहे की, ती रॉकेट लाँच करताना निर्माण होणारी अवकाशातील प्रतिकूल स्थितीही सहज झेलू शकते व कार्यरत राहू शकते.
अभिमानास्पद कामगिरी
भारताचा पहिला स्वदेशी ३२-बिट ‘विक्रम’ प्रोसेसर लॉन्च होणे ही अभिमानास्पद कामगिरी आहे. हा प्रोसेसर १८०एनएम प्रक्रियेत तयार करण्यात आला आहे. जागतिक आघाडीचे उत्पादक टीएसएमसी हे सब-५एनएम तंत्रज्ञानावर पोहोचलेले असताना भारताची ही सुरुवात उत्तम आहे. योग्य दिशा, गती, धोरणात्मक पाठबळ मिळाल्यास भारत लवकरच सेमीकंडक्टर क्षेत्रात झपाट्याने प्रगती करू शकेल, असा मला विश्वास आहे.- विनायक पंडित, सीईओ, पाको टेक्नॉलॉजीज कंपनी, पुणे