तीन महिन्यांत तब्बल ७१ हजार सिमकार्ड BLOCK! 'या' दोन राज्यात मोठी कारवाई, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:53 IST2025-03-13T18:52:42+5:302025-03-13T18:53:28+5:30
Sim Card Block News: आर्थिक फसवणूक रोखण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे

तीन महिन्यांत तब्बल ७१ हजार सिमकार्ड BLOCK! 'या' दोन राज्यात मोठी कारवाई, कारण काय?
Sim Card Block News: सरकार बनावट सिमकार्डविरुद्ध सतत कारवाई करत असते. त्याच अनुषंगाने दूरसंचार विभागाने (DoT) गेल्या ९० दिवसांच्या कालावधीत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुमारे ७१ हजार सिम कार्ड ब्लॉक केले आहेत. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. दूरसंचार विभाग अशा युजर्सवर सतत नजर ठेवून असते आणि त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहे. यामुळेच या सिमकार्डवर कारवाई करण्यात आली आहे आणि ती ब्लॉक करण्यात आली आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही सिम कार्ड फसवणूक करून मिळवली जातात. तसेच आर्थिक घोटाळ्यांमध्ये याचा वापर सर्रास केला जातो. त्याशिवाय, बनावट ओळखपत्रे देऊन ही सिम कार्ड घेतली जातात. त्यामुळे ही कारवाई आर्थिक घोट्याळ्यांना आळा घालण्यासाठी महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
सिमकार्ड घेताना फसवणूक कशी केली जाते?
अधिकाऱ्यांच्या मते, गुन्हेगारांनी पॉइंट ऑफ सेल (पीओएस) एजंट्सचा गैरवापर केला आणि बेकायदेशीरपणे सिम कार्ड मिळवले. या गुन्हेगारांनी बनावट ओळखपत्रांचा वापर करून सिम कार्ड मिळवले आणि लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. या मोठ्या कारवाईनंतर आता कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास संचार साथी पोर्टल, वेबसाइट किंवा हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी जनतेला केले आहे. जर फसवणूक झालेले लोक पुढे आले नाहीत, तर घोटाळेबाज त्यांची फसवणूक सुरूच ठेवतील. म्हणून अशा प्रकरणांची तक्रार करणे महत्वाचे आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बनावट सिमबाबत सरकारकडे कोणती यंत्रणा?
दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिम फसवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रोखण्यासाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यापैकी सर्वात प्रभावी म्हणजे: ASTR (AI आणि फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान वापरणारे साधन) - हे साधन टेलिकॉम सिम सबस्क्राइबर पडताळणीसाठी वापरले जाते. वेगवेगळ्या पत्त्यांसह आणि नावांसह अनेक सिम कार्ड मिळवणाऱ्या व्यक्तींना ओळखण्यासाठी ASTR चा वापर केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत अनेक बनावट सिम कार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत.