व्हॉट्सॲपवर इंटरनॅशनल कॉलपासून सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2023 10:18 IST2023-06-04T10:18:25+5:302023-06-04T10:18:56+5:30
सायबर गुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे.

व्हॉट्सॲपवर इंटरनॅशनल कॉलपासून सावधान!
सायबर गुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर अनोळखी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल तसेच मेसेज येण्याचे प्रमाण वाढले असून त्याद्वारे लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे. अनेक जण स्पॅम कॉल्सच्या तक्रारी करत असल्याने अलीकडेच सरकारनेही या नवीन व्हॉट्सॲप घोटाळ्याची दखल घेतली. तर, व्हॉट्सॲपही अशा घटना कमी करण्यासाठी आपल्या एआय आणि एमएल सिस्टमला अधिक स्ट्राँग बनवित आहे.
काय करावे?
अशा क्रमांकावरून आलेले मेसेज किंवा कॉल आणि अगदी मिस्ड कॉल्सलाही प्रतिसाद देणे पूर्णपणे टाळा.
अनोळखी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल, मेसेज प्राप्त होताच त्यांना ब्लॉक करणे आणि रिपोर्ट करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. व्हॉट्सॲपमध्येच हा पर्याय उपलब्ध आहे.
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही मेसेज किंवा लिंकवर चुकूनही क्लिक करू नका, त्यात तुमचा डेटा किंवा पैसे चोरण्यासाठी काही प्रकारचे मालवेअर असू शकतात. हॅकर किंवा स्कॅमर तुमचे पैसे चोरण्यासाठी तुम्हाला फसवू शकतात.
व्हॉट्सॲप अकाउंटसाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन सेटअप करावे. असे केल्यास तुमच्या खात्यात लॉगिन करताना पासवर्डशिवाय व्हेरिफिकेशन कोड देखील आवश्यक असतो.
प्रोफाइल फोटो, स्टेटस, लास्ट सीन आदींच्या सेटिंग्समध्ये बदल करून फक्त तुमच्या संपर्क यादीतील लोकांसाठीच ते दिसेल किंवा कोणालाच दिसणार नाही असा पर्याय निवडा.
अन्यथा कोणीही तुमच्याबद्दलची बरीच माहिती मिळवू शकतो.
स्पॅम काय?
पार्ट टाइम जॉब किंवा पैसे कमावण्याच्या विविध ऑफर्स देऊन आणि रग्गड लॉटरी अथवा जॅकपॉट जिंकल्याचे खोटे आमिष दाखवून गंडा घालणे. तसेच, न्यूड फोटो- व्हिडीओंद्वारे ब्लॅकमेलिंगही होऊ शकते.
कोणत्या क्रमांकावरून कॉल
हे कॉल्स इंडोनेशिया (+६२), व्हिएतनाम (+८४), इथिओपिया (+२५१), मलेशिया (+६०), केनिया (+२५४), आणि यांसारख्या वेगवेगळ्या देशांचे आहेत.