सावधान! ChatGPT आणि Geminiला चुकूनही विचारू नका 'या' गोष्टी; बसू शकतो मोठा फटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:46 IST2026-01-07T12:38:30+5:302026-01-07T12:46:20+5:30
'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हे सर्वज्ञानी असले तरी, त्यांना काही प्रश्न विचारणे तुम्हाला महागात पडू शकते.

सावधान! ChatGPT आणि Geminiला चुकूनही विचारू नका 'या' गोष्टी; बसू शकतो मोठा फटका!
सध्याच्या काळात अभ्यासापासून ऑफिसच्या कामापर्यंत सर्वत्र ChatGPT, Google Gemini आणि Grok सारख्या एआय चॅटबॉट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अवघड विषयांचे सोपे स्पष्टीकरण मिळवण्यासाठी किंवा झटपट माहिती मिळवण्यासाठी हे टूल्स अत्यंत उपयुक्त ठरतात. मात्र, 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हे सर्वज्ञानी असले तरी, त्यांना काही प्रश्न विचारणे तुम्हाला महागात पडू शकते. तुमच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी एआयला काही गोष्टी विचारणे आजच थांबवा.
काय आहेत ते ६ धोके?
आरोग्य आणि उपचारांबाबत प्रश्न टाळा : एआय चॅटबॉट हा डॉक्टर नाही. तो केवळ इंटरनेटवरील उपलब्ध माहितीच्या आधारे उत्तरे देतो. तुमच्या शरीराची तपासणी न करता दिलेले औषधोपचार किंवा सल्ले जीवावर बेतू शकतात. आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्या.
बँक डिटेल्स आणि खासगी माहिती कधीही शेअर करू नका : तुमचा बँक खाते क्रमांक, पासवर्ड, आधार कार्ड, पॅन नंबर किंवा UPI पिन कधीही AI ला सांगू नका. जरी या कंपन्या डेटा सुरक्षित असल्याचा दावा करत असल्या, तरी सिस्टीम सुधारण्यासाठी तुमचे मेसेज मानवी परीक्षकांकडून वाचले जाऊ शकतात. यामुळे डेटा लीक किंवा सायबर फ्रॉडची भीती असते.
बेकायदेशीर कामांसाठी सल्ला घेऊ नका : हॅकिंग, करचोरी, फसवणूक किंवा कायद्यातून सुटण्याचे मार्ग AI ला विचारणे तुम्हाला तुरुंगाची हवा खाऊ घालू शकते. अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यास तुमचे अकाउंट ब्लॉक होऊ शकते आणि कायदेशीर कारवाईचा ससेमिरा मागे लागू शकतो.
एआयची प्रत्येक गोष्ट खरी मानू नका : एआयकडे नेहमी रिअल-टाइम माहिती नसते. अनेकदा हे चॅटबॉट्स चुकीची किंवा जुनी माहिती देऊ शकतात. विशेषतः गुंतवणूक किंवा कायदेशीर सल्ल्यासाठी केवळ एआयवर अवलंबून राहू नका; अधिकृत स्त्रोताकडून माहितीची पडताळणी नक्की करा.
आयुष्यातील मोठ्या निर्णयांसाठी एआयवर विसंबून राहू नका : नोकरी सोडणे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी गुंतवणूक करणे यासारख्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या निर्णयांसाठी एआयचा सल्ला अंतिम मानू नका. चॅटबॉट तुमच्या भावना आणि सामाजिक परिस्थिती समजू शकत नाही. अशा वेळी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे कधीही चांगले.
मानसिक समस्या आणि भावनांची गुंतागुंत : एआय माणसासारख्या भावना अनुभवू शकत नाही. तो केवळ सहानभूतीची भाषा वापरतो. मानसिक ताण किंवा वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी एखाद्या मानवी समुपदेशकाशी किंवा जवळच्या व्यक्तीशी बोलणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. तंत्रज्ञान मदतीसाठी आहे, मालक होण्यासाठी नाही. त्यामुळे एआय वापरताना विवेकाने वापर करा आणि आपली सुरक्षा धोक्यात टाकू नका.