आर्टेमिस-२ फत्ते; पृथ्वीपासून लपलेला चंद्र पाहिला; अपोलो-१३ तील अंतराचा विक्रम काढला मोडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:59 IST2026-04-08T12:56:49+5:302026-04-08T12:59:44+5:30
न पाहिलेला चंद्र टिपला

आर्टेमिस-२ फत्ते; पृथ्वीपासून लपलेला चंद्र पाहिला; अपोलो-१३ तील अंतराचा विक्रम काढला मोडीत
वॉशिंग्टन: अपोलो- १३ नंतर सुमारे ५४ वर्षांनी चंद्राच्या अगदी जवळ पोहचून ‘नासा’ची ‘आर्टेमिस-२’ मोहीम फत्ते करीत चारही अंतराळवीर आता पृथ्वीच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत हे चौघे परतणे अपेक्षित आहे. चंद्राच्या जवळ म्हणजे ६,६५० किमी अंतरावर पोहचून भव्य चंद्र अनुभवलेल्या चारही अंतराळवीरांचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अभिनंदन केले आहे.
जवळ पोहचल्यानंतर समोर दिसणाऱ्या भव्य चंद्रामुळे झाकला गेलेला सूर्य आणि यामुळे निर्माण झालेला सूर्यग्रहणाचा अभास या अंतराळवीरांनी मनसोक्त अनुभवला. हे दृश्य पाहून ‘नेत्रदीपक... अद्भूत...’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया चौघांत उमटली.
असा प्रस्थापित झाला विक्रम
- अपोलो-१३ : १९७० - अंतर ४,००,१७१ किमी
- आर्टेमिस-२ : २०२६ – अंतर ४,०६,७८८ किमी
चंद्रामागील ती अंधारमय ४० मिनिटे
आर्टेमिस-२ मोहिमेतील चारही अंतराळवीरांचा सोमवारी रात्री उशिरा अचानक ४० मिनिटांसाठी पृथ्वीशी संपर्क तुटला आणि या मोहिमेकडे डोळे लावून बसलेल्या शास्त्रज्ञांच्या हृदयाचा ठोका चुकला. या वेळी अंतराळवीरांचा चंद्राच्या मागील भागात दाट अंधारात प्रवास सुरू होता. त्यांना पृथ्वी दिसत नव्हती. त्या वेळी त्यांच्याभोवती होती भयान शांतता आणि समोर होता महाकाय चंद्र.
आता पृथ्वीची आस
आर्टेमिस-२ यानातील ओरियन कॅप्सूलमध्ये असलेले हे चारही अंतराळीवर पृथ्वीकक्षेत प्रवेश केल्यानंतर पॅसिफिक महासागरात उतरतील. त्यांचा हा पृथ्वी कक्षेतील प्रवेश सर्वात काळजीचा व अधिक जिकिरीचा आहे. समस्त जग चंद्रापर्यंत जाऊन परतणाऱ्या या अंतराळवीरांच्या प्रतीक्षेत आहे.
न पाहिलेला चंद्र टिपला
अंतराळवीरांनी कुणीच आणि कधीही न पाहिलेला चंद्र कॅमेऱ्यामध्ये टिपला. पृष्ठभागाचे छायाचित्रण केले. उल्कापातामुळे निर्माण झालेले विवर, प्राचीन लाव्हांचे प्रवाह, जमिनीवर असलेल्या भेगा आणि टेकड्या टिपल्या. लवकरच पुन्हा चंद्रावर पाऊल, मंगळही लक्ष्य : अमेरिका लवकरच चंद्रावर पुन्हा पाऊल ठेवेल असा विश्वास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त करीत भविष्यात मंगळ ग्रहापर्यंत पोहचण्याचा मनोदय व्यक्त केला.