व्हॉट्सॲप चॅट्स खरंच सुरक्षित असतात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 10:25 IST2026-03-22T10:25:38+5:302026-03-22T10:25:55+5:30
खरी समस्या सुरू होते ती क्लाउड बॅकअपपासून.

व्हॉट्सॲप चॅट्स खरंच सुरक्षित असतात का?
आपण बहुतेकजण व्हॉट्सॲपवर निर्धास्तपणे गप्पा मारतो, कारण त्यात एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असतं, असं आपल्याला वाटतं. हे खरं आहे, पण फक्त मेसेज पाठवताना! खरी समस्या सुरू होते ती क्लाउड बॅकअपपासून. गुगल ड्राइव्ह किंवा आयक्लाउडवर सेव्ह होणारा बॅकअप नेहमी त्याच पातळीवर सुरक्षित नसतो.
म्हणजे, जर कुणाला तुमच्या क्लाउड अकाउंटमध्ये प्रवेश मिळाला, तर तुमचे चॅट्स, फोटो, व्हिडीओ पाहिले जाऊ शकतात. म्हणूनच व्हॉट्सॲपने दिलेली एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप ही सुविधा खूप महत्त्वाची आहे. यामुळे तुमची माहिती फक्त पाठवताना नाही, तर सेव्ह असतानाही सुरक्षित राहते. त्यासाठी तुमच्या डायरीला दुहेरी कुलूप लावल्यासारखं, लॉक व्हॉट्सॲपलाही लावा.
यामुळे काय प्रश्न सुटतो?
क्लाउड बॅकअपमधील डेटा सुरक्षित राहतो. अनधिकृत ॲक्सेसचा धोका कमी होतो. चॅट्स, फोटो, व्हिडीओ अधिक सुरक्षित होतात.
काय करायचं?
व्हॉट्सॲपमधील एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप ही सुविधा सुरू करा.
कसे कराल?
१) व्हॉट्सॲप उघडा. सेटिंग्जमध्ये जा
२) ‘चॅट्स’ निवडा. त्यानंतर ‘चॅट बॅकअप’वर टॅप करा
३) ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप’ निवडा
४) ही सुविधा सुरू करा आणि खालीलपैकी एक पर्याय निवडा : पास की, पासवर्ड, ६४ अंकी एन्क्रिप्शन की
५) तुमची सुरक्षा माहिती सुरक्षित ठेवा. कारण भविष्यात त्याच्याद्वारेच डेटा परत मिळेल
महत्त्वाची सूचना
जर तुम्ही पासवर्ड विसरलात किंवा एन्क्रिप्शन की हरवली, तर बॅकअप परत मिळवणं खूप कठीण किंवा अशक्य होऊ शकतं. म्हणूनच ही सुविधा सुरू करण्याआधी तुमची रिकव्हरी माहिती कुठे आणि कशी सुरक्षित ठेवायची हे ठरवणं अत्यंत गरजेचं आहे.
लक्षात ठेवा
व्हॉट्सॲप सुरक्षित आहे, पण तुमचा बॅकअप सुरक्षित ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे.