नव्याचे नऊ दिवस; स्वदेशी Arattai ची लोकप्रियता घटली; टॉप 100 Apps च्या यादीतून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:53 IST2025-11-05T11:52:58+5:302025-11-05T11:53:32+5:30
Arattai App Ranking: Arattai ची लोकप्रियता कमी झाल्याने Zoho ला मोठा धक्का बसला आहे.

नव्याचे नऊ दिवस; स्वदेशी Arattai ची लोकप्रियता घटली; टॉप 100 Apps च्या यादीतून बाहेर
Arattai App Ranking: 'नव्याचे नऊ दिवस' अशी मराठीत म्हण आहे. ही म्हण Atattai ला तंतोतत लागू होते. व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी आलेले भारतीय मेसेजिंग अॅप Arattai च्या लोकप्रियतेत मोठी घसरण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी झपाट्याने लोकप्रिय झालेले अॅप आता Google Play Store आणि Apple App Store या दोन्ही ठिकाणी टॉप 100 अॅप्सच्या यादीतून बाहेर झाले आहे.
सुरुवातीला "आत्मनिर्भर भारत" उपक्रमामुळे आणि स्थानिक उत्पादने वापरण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनामुळे Arattai ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण आता या अॅपची लोकप्रियता सतत घसरताना दिसत आहे.
झोहोसाठी मोठा धक्का
हे अॅप तयार करणारी कंपनी Zoho Corporation साठी ही घसरण मोठा धक्का मानली जात आहे. Arattai ला व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामसारख्या जागतिक दर्जाच्या मेसेजिंग अॅप्सना स्पर्धा द्यायची होती, परंतु सध्याच्या परिस्थितीत ते आव्हान टिकवणे कठीण झाले आहे.
प्रायव्हसीचा प्रश्न आणि तांत्रिक मर्यादा
युजर्समध्ये या अॅपच्या गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कारण सध्या Arattai मध्ये व्हॉट्सअॅपसारखे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन उपलब्ध नाही. कंपनीने सांगितले आहे की, ते या फीचरवर काम करत आहेत, मात्र सध्या हे फिचर नसणे, हेच रँकिंग घसरण्याचे एक प्रमुख कारण ठरत आहे.
Google Play Store रँकिंग
गूगल प्ले स्टोअरवरील "टॉप चार्ट्स" मध्ये Arattai ची रँकिंग टॉप 100 मधून घसरून आता 110 व्या स्थानावर पोहोचली आहे. तर "कम्युनिकेशन" श्रेणीत हे अॅप सातव्या क्रमांकावर आले आहे.
Apple App Store रँकिंग
Apple App Store मध्येही परिस्थिती काही वेगळी नाही. येथे Arattai 123 व्या क्रमांकावर पोहोचले आहे, तर "सोशल नेटवर्किंग" श्रेणीत त्याचे स्थान आठव्या क्रमांकावर घसरले आहे.
भविष्यातील अपेक्षा
तज्ञांचे मत आहे की, जर कंपनीने लवकरच एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसारख्या सुरक्षा सुविधा अॅपमध्ये आणल्या, तर Arattai ची रँकिंग आणि लोकप्रियता पुन्हा वाढू शकते. सध्या मात्र युजर्सचा विश्वास परत मिळवणे झोहोसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.