आयफोनच्या एक वर्षानंतर अँड्रॉईडचा पहिला फोन आला होता...आज बाजारात 88 टक्क्यांचा हिस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 16:43 IST2018-09-25T16:42:39+5:302018-09-25T16:43:20+5:30
गुगलच्या अँड्रॉईड सिस्टिमला 10 वर्षे पूर्ण झाली. 23 सप्टेंबर 2008 ला जगातील पहिला अँड्रॉईड ओएसवर चालणारा मोबाईल फोन HTC t-Mobile G1 हा लाँच करण्यात आला होता.

आयफोनच्या एक वर्षानंतर अँड्रॉईडचा पहिला फोन आला होता...आज बाजारात 88 टक्क्यांचा हिस्सा
गुगलच्याअँड्रॉईड सिस्टिमला 10 वर्षे पूर्ण झाली. 23 सप्टेंबर 2008 ला जगातील पहिला अँड्रॉईड ओएसवर चालणारा मोबाईल फोन HTC t-Mobile G1 हा लाँच करण्यात आला होता. ज्याला HTC Dream या नावानेही ओळखले जायचे. या फोनला एचटीसी आणि गुगलने मिळून बनविले होते. या फोनची किंमत 179 डॉलर ठेवण्यात आली होती.
पहिला अँड्रॉईड फोन दिसायला आताच्या फोनसारखा आकर्षक नव्हता तर साधारण होता. ज्याच्यामध्ये स्लायडिंग की-बोर्ड आणि ट्रॅकबॉल होता. या द्वारे टाईप आणि नेव्हिगेट केले जायचे. मात्र, या फोनमध्ये हेडफोन जॅक नव्हता.
आता अधिकृत अँड्रॉईड अॅप मिळणारे गुगलचे प्ले स्टोअर त्या फोनमध्ये नव्हते. तर त्यावेळी अँड्रॉईड मार्केट होते. अँड्रॉईड मार्केटद्वारे कोणत्याही परवानगीशिवाय अॅप अपलोड केले जात होते.
गुगलचा हा पहिला अँड्रॉईड फोन अॅपलच्या पहिल्या आयफोनच्या ठीक एक वर्षानंतर आला होता. अॅपलने पहिला फोन 29 जून 2007 ला लाँच केला होता. स्टेटिस्टाच्या माहितीनुसार 2009मध्ये अँड्रॉईड फोनचा मार्केट शेअर 1.6 टक्के होते, तर आयओएसचा मार्केट शेअर 10.5 टक्के होता. आज अँड्रॉईडने 88 टक्के बाजारपेठ व्यापली आहे, तर अॅपलने केवळ 11.9 टक्के बाजारपेठेचा हिस्सा राखला आहे.