AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:21 IST2026-01-01T17:19:18+5:302026-01-01T17:21:32+5:30
AI घरात... रस्त्यावर... शाळेत... शेतात... रुग्णालयात... मोबाइलमध्ये... कामात आणि मनातही.

AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
आपण उठतो, प्रवास करतो, काम करतो, पैसे वापरतो, उपचार घेतो आणि झोपतोही... या प्रत्येक टप्प्यावर एआय अदृश्य स्वरूपात सोबत असते. मोबाइलचा अलार्म, रस्त्यावरील सिग्नल, बँकेतील व्यवहार, हॉस्पिटलमधील रिपोर्ट किंवा ऑनलाइन शिक्षण अशी अनेक कामे आता मोठ्या प्रमाणावर एआय करत आहे.
आपलं आयुष्य अधिक सोपं, वेगवान आणि अचूक करण्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हे नवे वर्ष एआयला मित्र बनवून जगण्याचं वर्ष आहे. कारण एआय आता सर्वत्र आहे...
दिवसाची सुरुवात एआयसोबत
सकाळी डोळे उघडतात, हात घड्याळाकडे किंवा मोबाइलकडे जातो आणि दिवस सुरू होतो. आपल्याला ते जाणवत नाही. पण दिवसाची पहिली काही मिनिटे ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सोबतीनेच सुरू होतात.
काय आहे हवामानाचा अंदाज?
हवामानाचा अंदाज येतो कुठून? एआय उपग्रह डेटा, वाऱ्यांची दिशा, ढगांची हालचाल आणि मागील अनेक वर्षांचा अभ्यास एकत्र करून सांगतो की आज पाऊस पडेल का, उन्हाची तीव्रता किती असेल, उष्णतेची लाट आहे का किंवा थंडी वाढणार आहे का? आज बाहेर पडताना काळजी काय घ्यायची? याचा निर्णय घेणे एआयमुळे सोपे होते आहे.
कोणत्या बातम्या तुम्ही वाचाव्या?
सकाळी तुम्हाला कोणत्या बातमीचे नोटिफिकेशन्स पाठवायचे, हे कोण ठरवते? एआय. कारण तुमच्या वाचनाच्या सवयी, तुम्ही कोणत्या बातम्यांवर थांबता, कोणते विषय तुम्हाला आवडतात हे त्याने ओळखलेले असते.
दिवसाचे नियोजनही आता एआयकडेच
आज मीटिंग आहे, औषध घ्यायचं आहे, फाइल सबमिट करायची आहे... या सगळ्याची आठवण एआय करून देतो. कॅलेंडर, रिमाइंडर आणि टू-डू लिस्ट यांच्या मागे असा एआय असतो, मग तो योग्य क्षणी रिमाइंडही करतो.
हातात एआय घेऊन फिरतो आपण
आज मोबाइल म्हणजे आपला कॅमेरा आहे, बँक आहे, डायरी आहे, टीव्ही आहे, ऑफिस आहे… थोडक्यात सांगायचे तर तो आपल्या रोजच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला आहे. या सगळ्याच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट आहे... एआय.
मोबाइल अनलॉकही एआय करतो
तुम्ही मोबाइल उघडताना ना पासवर्ड टाकता, ना काही शोधता. क्षणात स्क्रीन उघडते. कारण एआय तुमचा चेहरा, डोळ्यांची हालचाल आणि बोटांचा ठसा ओळखतो. प्रत्यक्षात हे सुरक्षेचं काम एआय करत असतो.
मेसेजमध्ये एआय असतोच
मेसेज टाइप करताना शब्द चुकले तरी ते दुरुस्त होतात, पुढचा शब्द आधीच सुचतो, आणि इंग्रजी–मराठी–हिंदी भाषांतर क्षणात होते. कसे? एआयमुळेच.
हा कॉल उचलावा की नाही?
हा प्रश्नही आता तुम्हाला पडत नाही. एआय संशयास्पद नंबर ओळखतो, स्पॅम कॉल ब्लॉक करतो आणि फसवणुकीचा इशारा देतो. म्हणजे, तुमचे डिजिटल संरक्षणही एआय करतो.
कोणता मेल आहे महत्त्वाचा?
शेकडो ई-मेल्स, फाईल्स आणि फोटो यांच्या गर्दीतून काय महत्त्वाचं आहे, हे शोधण्याचं कामही एआय करत असतो. फोटो गॅलरीतील 'लोक', 'ठिकाण' किंवा 'घटना' ओळखतो.
मोबाइल चक्क बोलतो तुमच्याशी
व्हॉइस असिस्टंटमुळे तर मोबाइलशी संवादच बदलून गेला. आज पाऊस पडेल का?, आईला कॉल कर, अलार्म लावा... असे बोलताच काम पूर्ण होते. यामागेही एआयच असतो.
तो आहे तुमच्या प्रवासातला मित्रही
घरातून बाहेर पडताना आपण फक्त एवढंच ठरवतो, 'निघायचं आहे.' पण कोणत्या रस्त्याने जायचे, किती वेळ लागेल, कुठे अडथळे आहेत आणि कधी पोहोचू, हे सगळे निर्णय आज मोठ्या प्रमाणावर एआय घेत असतो.
गुगल मॅपमध्येही असतो सज्ज
गुगल मॅप्ससारखी अॅप्स आता निर्णय घेणारी यंत्रणा बनली आहेत. एआय सध्याची वाहतूक पाहतो, अपघात झाले आहेत का, रस्ता बंद आहे का किंवा कुठे काम सुरू आहे का हे क्षणात शोधतो. हजारो वाहनांच्या हालचालींचा डेटा एकत्र करून 'हा मार्ग बदलला तर वेळ वाचेल' असा सल्ला देतो.
ग्रीन सिग्नल द्यायचा की रेड?
अनेक शहरांमध्ये सिग्नल एआयच्या नियंत्रणात असतो. कुठल्या रस्त्यावर किती वाहने आहेत, कुठे गर्दी वाढतेय, हे एआय पाहतो. गरज पडल्यास सिग्नलचा वेळ बदलतो आणि रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन सेवांना प्राधान्य देतो.
किती द्यावे कॅबसाठी पैसे?
कॅब बुक करताना दर कधी वाढतो, कधी कमी होतो, हे आपण ठरवत नाही. एआय मागणी किती आहे, वाहने किती उपलब्ध आहेत, हवामान कसे आहे, वेळ कोणती आहे, शहरात कुठे कार्यक्रम किंवा गर्दी आहे का? या सगळ्याचा विचार करून दर ठरवतो.
चालक थकला की देतो सूचना
वाहन चालक थकला आहे का हे एआय यंत्रणा ओळखू शकते, झोप येत असल्याचा इशारा देते, अचानक ब्रेक लागला तर सावध करते.
उपचारातही होते बहुमोल मदत
आज हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर दिसतात, नर्स दिसतात, विविध मशीन दिसतात. पण या सगळ्यांसोबत एक असा घटक सतत काम करत असतो, तो म्हणजे एआय.
रिपोर्ट पाहून निष्कर्ष काढणे अधिक सोपे
पूर्वी एक्स-रे, सीटी स्कॅन किंवा एमआरआय रिपोर्ट पाहून निष्कर्ष काढायला वेळ लागायचा. एआय या रिपोर्टमधील डोळ्यांना सहज न दिसणारे सूक्ष्म बदल काही सेकंदांत ओळखतो. आजाराची सुरुवातीची लक्षणे तो आधीच टिपतो आणि स्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज देतो.
लक्षणे सांगितली की चॅटबॉट्सचे मार्गदर्शन
आज आरोग्य सल्लाही एआय देतो. छातीत दुखणे, ताप, सर्दी किंवा श्वासोच्छ्वासाचा त्रास यासारखी लक्षणे सांगितली की एआय आधारित हेल्थ चॅटबॉट्स प्राथमिक मार्गदर्शन करतात.
एआयमुळे आधीच मिळू शकतो इशारा
फिटनेस ट्रॅकर्स आणि स्मार्ट वॉचेसही शरीरावर सतत लक्ष ठेवतात. हृदयाचे ठोके, पावले, झोपेचा वेळ आणि ताणतणाव यासारखा डेटा एआय सतत विश्लेषित करतो. त्याद्वारे आरोग्याबद्दलचे इशारे एआय आधीच देतो.
तुमच्या पैशांची करतो निगराणी
आपण पैसे वापरताना फार विचार करत नाही. मोबाइलवर क्लिक, यूपीआय स्कॅन, कार्ड स्वाइप किंवा एटीएममधून पैसे काढणे... सगळे सहज होते. पण या सहजतेमागे एक अदृश्य यंत्रणा सतत काम करत असते आणि ती म्हणजे एआय.
फसवणूक होण्याआधीच थांबते
तुम्ही व्यवहार करता त्या क्षणी बँकेत बसलेला अधिकारी नाही, तर एआय सर्वप्रथम जागा होतो. खात्यातून पैसे गेले की लगेच मेसेज येतो. व्यवहार योग्य आहे की संशयास्पद, हे एआय काही सेकंदांत ठरवतो. वेगळे वाटले, तर तो तात्काळ अलर्ट देतो. त्यामुळे फसवणुका होण्याआधीच थांबतात.
खर्चाचे नियोजनही सुचवतो एआय
आज अनेक अॅप्स तुमचा खर्च कुठे होतो हेही सांगतात. महिना संपल्यावर 'तुमचा इतका खर्च प्रवासावर, इतका खरेदीवर, इतका बिलांवर' अशी माहिती दिसते. हे सगळे एआयच्या विश्लेषणामुळे शक्य होते.
गुंतवणुकीच्या निर्णयात एआयची मदत
गुंतवणुकीच्या बाबतीतही एआय मागे काम करत असतो. शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये तुमची जोखीम किती आहे, तुमचे उत्पन्न किती आहे, उद्दिष्ट काय आहे, या सगळ्यांचा विचार करून एआय आधारित रोबो-अॅडव्हायजर्स सल्ला देतात. निर्णय घेणे सोपे जाते.
कर्ज मंजुरीचा निर्णय होतो लवकर
कर्ज घेतानाही एआयचा सहभाग वाढत आहे. कर्ज देताना तुमची आर्थिक शिस्त, परतफेडीचा इतिहास आणि उत्पन्नाचा अंदाज एआय तपासतो. त्यामुळे कर्ज मंजुरीचा निर्णय जलद होतो आणि प्रक्रियेत पारदर्शकता येते.
शिकण्याची पद्धत बदलते आहे
आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी एकच अभ्यासक्रम, एकच वेग व एकच परीक्षा पद्धत होती. वर्गात विद्यार्थी वेगवेगळे असायचे. कुणाला पटकन समजायचे, कुणाला वेळ लागायचा, पण शिकवण्याची पद्धत सगळ्यांसाठी सारखीच असायची. आज एआयमुळे शिक्षण विद्यार्थ्याला समजून घेणारे बनत आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळं शिक्षण
एआय आधारित शिक्षण अॅप्स आणि प्लॅटफॉर्म विद्यार्थ्याचा अभ्यास करण्याचा वेग, त्याच्या चुका, त्याच्या आवडी-नावडी आणि समजण्याची पद्धत यांचा अभ्यास करतात. कुणाला गणितात अडचण येत असेल, तर एआय अधिक सराव देतो. भाषा अवघड वाटत असेल, तर सोप्या उदाहरणांमधून शिकवतो. म्हणजेच, अभ्यासक्रम विद्यार्थ्याशी जुळवून घेतो.
शिकणं म्हणजे पाठांतर नाही
पारंपरिक शिक्षणात पाठांतराला जास्त महत्त्व होते. एआय आधारित शिक्षण मात्र विश्लेषण व विचारशक्तीवर भर देते. विद्यार्थ्याने प्रश्न कसा सोडवला, कुठे अडखळला हे एआय टिपतो. त्यावरून पुढचा अभ्यास ठरवतो.
ऑनलाइन शिक्षणाचा नवा अर्थ
ऑनलाइन शिक्षण म्हणजे फक्त व्हिडिओ पाहणे नव्हे. एआयमुळे ऑनलाइन शिक्षण अधिक संवादात्मक झाले. यामुळे दूरस्थ भागातील, ग्रामीण भागातील किंवा शाळेबाहेर असलेले विद्यार्थीही दर्जेदार शिक्षणाशी जोडले जात आहेत.
परीक्षा आणि मूल्यमापनात बदल
एआयमुळे परीक्षा व मूल्यमापनाची पद्धतही बदलते आहे. असाइनमेंट तपासणे, उत्तरपत्रिका तपासणे, कॉपी ओळखणे, हे एआय अचूकपणे करू शकतो. शिक्षकांचा वेळ वाचेल. एआयमुळे विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेता येईल.
शिक्षकांचा रोल बदलतोय
एआयमुळे शिक्षकांची गरज कमी होत नाही, ती बदलते आहे. शिक्षक आता माहिती देणारे न राहता, मार्गदर्शक व प्रेरक बनत आहेत. एआय डेटा देतो, पण त्या डेटामागचा अर्थ, मूल्य आणि दिशा देण्याचे काम शिक्षक करतात.
समान संधींकडे वाटचाल
एआयमुळे शिक्षण अधिक समावेशक बनण्याची शक्यता वाढली आहे. योग्य वापर झाल्यास एआय शिक्षणातील दरी कमी करू शकतो. शहर-ग्रामीण, श्रीमंत-गरिब, इंग्रजी-मराठी असा फरक कमी होऊ शकतो.
एआय तू आमचा सखा...
खरेदी असो वा मनोरंजन, घर असो वा शेती, शहर असो वा ग्रामीण जीवन... आज एआय प्रत्येक टप्प्यावर आपल्यासोबत आहे. सोशल मीडियावर काय दिसेल ते ठरवण्यापासून घरातील ऊर्जा बचतीपर्यंत, पिकांच्या आरोग्यापासून पुरवठा साखळीपर्यंत एआय निर्णय घेतो. सुरक्षा, कायदा, शासन सेवा, आपत्ती व्यवस्थापन यात तो वेळेत मदत करतो. बालसुरक्षा, मानसिक आरोग्य, वृद्ध व दिव्यांगांचे जीवन अधिक सुलभ करतो. धार्मिक, सांस्कृतिक, लोकशाही प्रक्रिया, विमा, पर्यटन आणि आहार व्यवस्थेतही एआय नवा अर्थ देतो. दिसत नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एआय सोबत आहे.
एआय आपला सहकारी आहे...
एआय आपला सखा आहे...
पण एआय म्हणजेच काही सर्वस्व नाही...
आपला मेंदू हा कायमच ‘इनोव्हेटिव्ह’ असेल...
त्याला साथ लाभेल एआयची... प्रगतीसाठी...