महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंचा राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा, तीन चॅम्पियन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 17:24 IST2018-12-31T17:23:45+5:302018-12-31T17:24:04+5:30
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तीन सुवर्णपदक, एक रौप्यपदक व चार कांस्यपदक जिंकली.

महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंचा राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा, तीन चॅम्पियन्स
सोनपत(हरयाणा) : मुलींच्या ज्युनिअर सांघिक गटात सुवर्णपदक मिळवल्यानंतर महाराष्ट्राच्याटेबल टेनिस खेळाडूंनी इलेव्हन स्पोर्ट्स 80 व्या ज्युनिअर व युथ टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक गटात आणखीन आठ पदकांची कमाई केली. ज्यामध्ये तीन सुवर्णपदक, एक रौप्यपदक व चार कांस्यपदकांचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या श्रुती अमृतेने पीएसपीबीच्या प्राप्ती सेनला मुलींच्या युथ गटातील एकेरीच्या अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत 4-2 अशा फरकाने पराभूत करत राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. तिच्याच राज्याच्या चिन्मया सोमय्या व रिगन अलबुक्युरेक्यू यांनी महाराष्ट्राच्याच दिपीत पाटील व देव श्रॉफ जोडीला मुलांच्या ज्युनिअर दुहेरी गटातील अंतिम सामन्यात 3-2 असे नमवित सुवर्णपदक मिळवले. दिपीत व देव यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
मुलींच्या ज्युनिअर दुहेरी गटातील अंतिम सामन्यात दिया चितळे व मनुश्री पाटील जोडीने पश्चिम बंगालच्या पॉयमंती बैस्य आणि मुनमुन कुंडू यांना 3-1 असे पराभूत करत जेतेपद मिळवले.यासोबत वैयक्तिक गटात अनेक खेळाडूंना उपांत्यफेरीपर्यंत पोहोचण्यात यश आले त्यांनी कांस्यपदकाची कमाई केली.
मुलांच्या दुहेरीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रिगनला एकेरीत मुलांच्या ज्युनिअर एकेरीत दिल्लीच्या पायस जैनने पराभूत केल्याने त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचा आणखी एक खेळाडू दिपीत पाटीलला उपांत्यफेरीत पराभूत झाल्याने कांस्यपदक मिळाले.