ZP च्या विद्यार्थिनीनं सोशल मीडिया गाजवला; सरलच्या हस्ताक्षरावर होतोय लाइक्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:37 IST2025-01-27T14:37:11+5:302025-01-27T14:37:32+5:30

या विद्यार्थिनीचे हस्ताक्षर इंटरनेटच्या युगात इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचले.

ZP student takes social media by storm Sarals handwriting is getting a lot of likes | ZP च्या विद्यार्थिनीनं सोशल मीडिया गाजवला; सरलच्या हस्ताक्षरावर होतोय लाइक्सचा पाऊस

ZP च्या विद्यार्थिनीनं सोशल मीडिया गाजवला; सरलच्या हस्ताक्षरावर होतोय लाइक्सचा पाऊस

संतोष थोरात, खर्डा : जामखेड तालुक्यातील धनगरवस्ती- देवदैठण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीच्या सुंदर हस्ताक्षराची सध्या सोशल मीडियावर धूम आहे. सरल लहू बोराटे, असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल पहिली ते दुसरी गटातून तिने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर तिचे हस्ताक्षर इंटरनेटच्या युगात इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचले. तिचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. 

बालाघाटच्या डोंगररांगेच्या कुशीत व मराठवाड्याच्या सरहद्दीवर अहिल्यानगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या दुर्गम भागात देवदैठण गावातील धनगरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. अशा दुर्गम भागातील सरल बोराटे हिने हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हास्तरावर मिळविलेले यश लक्षवेधी ठरले आहे. दुर्गम भागात शाळा असली तरी येथील मुले-मुली स्वतःला सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या क्षमतांना चॅलेंज देत आहेत. सरलचा स्वतःच्या मेहनतीवर प्रचंड विश्वास आहे. दररोज सकाळी तिचे पालक अर्धा तास हस्ताक्षराचा सराव करून घेतात. तिचे वडील लहू विक्रम बारोटे हेही शिक्षक आहेत. मुख्याध्यापक जालिंदर चिलगर, उपमुख्याध्यापक लहू बोराटे, शाळेतील शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तिने विविध हस्ताक्षर स्पर्धामध्ये मानाचे नामांकन मिळविले आहे. या शाळेतील इयत्ता चौथीतील सागर विठ्ठल ठेंगे तालुक्यात पहिला व जिल्ह्यात तिसरा, तर इयत्ता पाचवीतील कार्तिक वैजनाथ चिलगर याने तालुक्यात हस्ताक्षर स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला. धनगरवस्ती शाळेत पहिली ते पाचवी, असा ४५ विद्यार्थ्यांचा पट आहे. सरलचे वडील लहू बोराटे यांनी तिच्या हस्ताक्षराचे व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्राम, फेसबुकवर पोस्ट केले आहेत.

इतरही उपक्रमांमध्ये सहभागी 

सरल दुसरीच्या वर्गात शिकते. मात्र, ती खूप वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होते. हस्ताक्षरासोबतच वक्तृत्व स्पर्धेतही चमकदार कामगिरी करत आहे. समाजभान, मैत्रीची भावना, सर्वांसोबत सहकार्याने, प्रेमाने वागणे, सतत आनंदी राहणे, आपली कामे वेळच्यावेळी करणे, असे अनेक गुण तिच्यामध्ये आहेत.

Web Title: ZP student takes social media by storm Sarals handwriting is getting a lot of likes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.