महिलांचा आधार गेला; ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 13:08 IST2020-04-28T13:04:45+5:302020-04-28T13:08:44+5:30
अन्यायग्रस्त, कौटुंबिक समस्यांनी त्रस्त, निराधार महिलांच्या आधार बनलेल्या अपर्णाताई संकटमोचक होत्या.

महिलांचा आधार गेला; ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन
सोलापूर : सोलापूरचे जेष्ठ पत्रकार स्वर्गीय अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान सोलापुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
गेल्या महिन्यात गुढीपाडव्यादिवशी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावेळेसपासून त्या सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. मात्र आज पावणेबारा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तसेच मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नातू असा परिवार आहे.
अन्यायग्रस्त, कौटुंबिक समस्यांनी त्रस्त, निराधार महिलांच्या आधार बनलेल्या अपर्णाताई रामतीर्थकर संकटमोचक होत्या. त्यांनी अनेक महिलांचे तुटलेले संसार जोडले. महिलांना कायदेविषयक हक्क आणि अधिकार यावर त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्या स्वतः वकील असल्याने असंख्य महिलांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या जाण्याने महिलांचा आधार गेला. रात्री अपरात्री अडचणीत सापडलेली महिला त्यांच्याशी फोनवरून मदतीसाठी हाक द्यायची तेंव्हा त्या धावून जात असत.