‘सिद्धेश्वर’ची चिमणी पाडण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार; सोलापूर डेव्हलपमेंट फोरमचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:18 IST2020-11-13T13:17:14+5:302020-11-13T13:18:56+5:30
प्रशासनाकडून होतेय दिशाभूल :

‘सिद्धेश्वर’ची चिमणी पाडण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार; सोलापूर डेव्हलपमेंट फोरमचा निर्णय
सोलापूर : होटगी रोडवरील विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची बेकायदा ठरलेली चिमणी पाडलीच पाहिजे, यासाठी सोलापूर डेव्हलपमेंट फोरम रस्त्यावरील लढाईपेक्षा न्यायालयीन लढाई लढणार असल्याची माहिती उद्योजक केतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशनची चिमणी अडसर ठरत आहे. ही चिमणी बेकायदा व अनधिकृतरित्या असल्याने पाडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. सर्व न्यायालयांनी ही चिमणी बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करून त्या पाडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र जिल्हाधिकारी आणि सोलापूर महापालिका प्रशासन हा न्यायालयीन आदेश पाळत नाहीत. त्यांच्याकडून या आदेशाचा वारंवार अवमान होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप महापालिकेला चिमणी पाडकामाविषयी आदेशच का दिला नाही, असा सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
एका माणसाच्या हट्टापाई तसेच १५ कोटींचे नुकसान टाळण्यासाठी सोलापूरच्या भवितव्याशी प्रशासन आणि काही लोक खेळत आहेत, असा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला. या पत्रकार परिषदेस संजय थोबडे, प्रमाेद शहा, योगीन गुर्जर, गिरीकर्विणका फाउंडेशनचे विजय जाधव, ॲड. प्रमाेद शहा उपस्थित होते.
गाळप हंगामास विरोध नाही !
सोलापूर डेव्हलपमेंट फोरमचा श्री सिद्धेश्वर कारखान्यास, त्यांच्या गाळप हंगामास विरोध नसून विमानसेवेस अडथळा असलेल्या को-जनरेशनच्या अनधिकृत बेकायदेशीर चिमणीचे पाडकाम न्यायालयाच्या आदेशानुसार व्हावे, ही आमची प्रमुख मागणी असल्याचेही सोलापूर डेव्हलपमेंट फोरमच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.