ऑनलाइन ९९३ रुपयाची लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 13:15 IST2020-11-03T13:14:57+5:302020-11-03T13:15:31+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ऑनलाइन ९९३ रुपयाची लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले
सोलापूर : बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी शासकीय शुल्क व्यतिरिक्त ९९३ रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी महिला अभियंत्यांसह दोघांना पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपअभियंता शिवराम जनार्दन केत (वय ४९ रा. दक्षिण कसबा शिंदे चौक), कनिष्ठ अभियंता सुवर्णा शिवाजी सगर (वय ३२ रा. प्रभा हाइट्स काळी मशीद जवळ उत्तर कासबा) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदाराला बांधकाम मटेरियल तपासून घ्यायचे होते. त्यामुळे ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालयात गेले होते. तेथे शिवराम केत व सुवर्ण सागर या दोघांनी तपासणी फी म्हणून ६५०० रुपये भरण्यास सांगितले. ही रक्कम शासकीय शुल्क पेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता ६५०० रुपये मागितले निष्पन्न झाले. दोघांनी तक्रारदारास तडजोडी अंती पाच हजार रुपये भरण्यास सांगितले. शासकीय सेवाशुल्क चार हजार सात रुपये असताना दोघांनी पाच हजार रुपये भरून घेतले, उर्वरित रक्कम ९९३ रुपये ऑनलाइन वरून लाच म्हणून स्वीकारली. याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई....
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, हवालदार बिराजदार, महिला पोलीस नाईक अर्चना स्वामी, पोलीस नाईक श्रीराम घुगे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी ही कारवाई पार पाडली.