'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:41 IST2025-11-20T18:40:06+5:302025-11-20T18:41:03+5:30
Balraje Rajan Patil Umesh Patil: अनगर नगरपंचायतीच्या निवडणूक चांगलीच चर्चेत आली. सदस्य आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणलेल्या राजन पाटील यांच्या मुलाने थेट अजित पवारांनाच इशारा दिला. हे प्रकरण अजूनही मिटलेलं नाही.

'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
Balraje Patil News: "अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा, पण अनगरकरांचा नाद करायचा नाही", असे वक्तव्य करणाऱ्या बाळराजे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी माज उतरवणार असा इशारा दिला आहे. राजन पाटील यांनी मुलाला माफ करावं अशी विनंती केल्यानंतर 'आमच्याकडे चुकीला माफी नाही', असे म्हणत उमेश पाटलांनी उत्तर दिले आहे.
मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक यावेळी चांगलीच रंगली. अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अनगर नगरपंचायत निवडणुकीत बिनविरोध पॅनेल निवडून आणले. त्याचबरोबर नगराध्यक्षही बिनविरोध निवडून आणला. या विजयानंतरच बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना इशारा दिला होता.
पाटलांचा माज आम्ही उतरवणार -उमेश पाटील
उमेश पाटील बाळराजे पाटील यांच्या विधानावर बोलताना म्हणाले की, "पाटलाला माफी नाही. आमच्याकडे चुकीला माफी नाही. अनगरच्या पाटलाचा माज आम्ही उतरवणार."
उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्यावर खून केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, "बाळराजे पाटलाने मोहोळच्या पंडित देशमुख यांची हत्या केली. त्यातून तो निर्दोष सुटला असला, तरी यावर उच्च न्यायालयात याचिका आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपेक्षाही भयंकर आणि निर्घृण हत्या पंडित देशमुख यांची झाली होती."
"उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल आहे. मात्र, २० वर्षात केस बोर्डात आहे. उच्च न्यायालयातील मोठ्या अधिकाऱ्याला हाताशी धरून ही केस सुनावणीसाठी येऊ दिली नाही", असा गंभीर आरोप उमेश पाटील यांनी केला आहे.
उमेश पाटलांकडून जयकुमार गोरेंचे कौतुक
"पालकमंत्री जयकुमार गोरे हे चांगले नेते आहेत. ते सोलापूर जिल्ह्यासाठी वेळ देत आहे. भाजपला लक्षात आले आहे की, मोहोळमध्ये फुलायचं असेल, तर डबक्याची गरज आहे. डबक्याची म्हणतोय, कारण गटार म्हटले की त्यांना राग येतो. त्यांनी राजन पाटील या डबक्याला पक्षात घेतले आहे. पवार कुटुंबाने यांच्यावर एवढे उपकार केले आहे. 15 दिवसापूर्वी पक्ष बदलल्यावर ते अजित पवारांबद्दल अशी भाषा वापरत आहेत. आगामी काळात ते मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री यांच्याबद्दल बोलायला मागे पडणार नाहीत", असेही उमेश पाटलांनी सुनावले.