सोलापूर शहरात दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत; उजनी ते सोलापूर जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 21:59 IST2021-05-12T21:59:06+5:302021-05-12T21:59:43+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर शहरात दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत; उजनी ते सोलापूर जलवाहिनी फुटली
सोलापूर/टेंभुर्णी - महापालिकेची उजनी ते सोलापूर जलवाहिनी बुधवारी रात्री सापटणे (ता. माढा)जवळ फुटली. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. यामुळे शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
उजनी ते सोलापूर जलवाहिनी बुधवारी रात्री ८ च्या सुमाराला अचानक फुटली. सापटणे गावाजवळ पाण्याचे फवारे उडत होते. पालिकेच्या यंत्रणेला ही माहिती कळताच उजनी पंपगृह बंद करण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेचे कर्मचारी रवाना झाले. दुरुस्तीचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे पाकणी पंपगृहाला पाणी पुरवठा होणार नाही.
गुरुवारी आणि शुक्रवारी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी केले आहे.