विजयदादांचा नवा बॉम्ब; भाजपाने उमेदवारी दिल्यास माढ्यातून लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 14:44 IST2019-03-27T13:15:46+5:302019-03-27T14:44:13+5:30
विजयदादांच्या या नव्या भूमिकेमुळे माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय बॉम्ब पडला.

विजयदादांचा नवा बॉम्ब; भाजपाने उमेदवारी दिल्यास माढ्यातून लढणार
अमर गायकवाड
माढा : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने उमेदवारीची आॅफर दिली तर उभारण्यास तयार आहे असा नवा राजकीय बॉम्ब राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज माढयात ‘लोकमत’शी बोलताना टाकला.
माढा येथे माजी आमदार धनाजी साठे यांच्या निवासस्थानी आल्यानंतर ते बोलत होते. तुम्ही तर राष्ट्रवादीत आहात मग युतीकडून माढा लोकसभा मतदारसंघात उभारण्याची तुमची तयारी असेल तर भाजपामध्ये जाणार का ? असा सवाल ‘लोकमत’ प्रतिनिधींने विचारला असता विजयदादा हसत म्हणाले की, रणजितदादा आॅलरेडी भाजपात पुढे गेले आहेत त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिली तर मी उभारण्यास तयार आहे.
विजयदादांच्या या नव्या भूमिकेमुळे माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय बॉम्ब पडला असून भाजपाची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे़ सध्या फलटणचे रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांना भाजपाची उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याचे वरिष्ठ पातळीवरून सांगितले जात असतानाच विजयदादांच्या या नव्या भूमिकेमुळे माढ्यात धक्कातंत्र अवलंबिले जाऊ शकते, असे जाणवू लागले आहे.
यावेळी माजी आमदार धनाजीराव साठे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, भाजप प्रांतिक सदस्य राजकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे, रवींद्र ननवरे, गुरूराज कानडे आदी उपस्थित होते़