Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:25 IST2025-09-29T12:24:41+5:302025-09-29T12:25:26+5:30
ज्योती वाघमारे आणि जिल्हाधिकारी यांच्यातील हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
सोलापूर - सीना नदीला पूर आल्याने माळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पुराचा फटका बसला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यातच शिंदेसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून वाघमारे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारेंना सुनावल्याचे पाहायला मिळाले. राजकारण करू नका, तुमची मदत वाढवा असा सल्ला जिल्हाधिकऱ्यांनी ज्योती वाघमारेंना दिला.
ज्योती वाघमारे आणि जिल्हाधिकारी यांच्यातील हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं या दोघांमध्ये काय बोलणे झाले हे जाणून घेऊया...
जिल्हाधिकारी - गावकऱ्यांना विचारले, तर ते पंचनामे झाले नाहीत असं बोलतील, परंतु आपण सरसकट मदत करणार आहोत. त्यांना मंगळवारी किंवा बुधवारपासून त्यांच्या खात्यात ५-५ हजार जाणे सुरू होईल. तुम्हाला हे माहिती असले पाहिजे. तुम्ही तिथे उभे आहात, लोक आहेत. परंतु सध्या आमचे प्राधान्य माढा-करमाळा जिथे सर्वात जास्त पुराचा फटका बसला आहे. आणखीही पूर येण्याची शक्यता आहे. धाराशिव-अहिल्यानगर येथे मोठा पाऊस झाला आहे. तुम्ही नेत्या आहात, तुम्ही तिथल्या लोकांना परिस्थिती समजावून सांगा. असं नको व्हायला जिल्हाधिकाऱ्यांना फोन करा, तुम्ही बोला त्यांच्याशी...
ज्योती वाघमारे - नाही, नाही सर, मी समजून घेतेय..परंतु आमची तुम्हाला विनंती आहे जेवणाचे किट तरी पाठवून द्या, ३ हजार लोक आहेत ५००-६०० किट कसं चालेल?
जिल्हाधिकारी - ऐका ना मॅडम, जेवणाचे किट ३ हजार लोकांना देणे शक्य नाही, म्हणून आम्ही तांदूळ, गहू देतोय.
ज्योती वाघमारे - सर, ते पोहचायला २ दिवस लागतील, आम्हीपण मदत घेऊन आलोय.
जिल्हाधिकारी - एक काम करा, तुमच्या शिवसेना पक्षाकडून तुम्ही मदत करा.
ज्योती वाघमारे - सर मदत घेऊनच आलोय, तुम्ही सांगायच्या आधी किट घेऊनच आलोय
जिल्हाधिकारी - तुम्ही सध्या ३ हजार लोकांची मदत करा, आपली यंत्रणा २-३ दिवसांत पोहचेल.
ज्योती वाघमारे - सर, आम्ही मदत करायलाच आलोय. तुम्ही आम्हाला सांगण्याआधीच मदत करायला आलोय..
जिल्हाधिकारी - नाही, नाही तेवढे होत नाही, मला माहित्येय..
ज्योती वाघमारे - सर, आम्ही किट घेऊन आलोय
जिल्हाधिकारी - तुम्ही किती किट आणल्या आहेत?
ज्योती वाघमारे - साहेब, आम्ही जेवणाची नाही, अन्नधान्याची किट आणली आहे.
जिल्हाधिकारी - किट किती आणल्या आहेत?
ज्योती वाघमारे - सध्या आम्ही २०० किट आणल्यात, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय
जिल्हाधिकारी - तिथे किती लोक आहेत?
ज्योती वाघमारे - साहेब, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय
जिल्हाधिकारी - अहो, तुम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या नेत्या नाहीत ना, तिकडे किती लोक आहेत आता, तुम्ही २०० किट आणल्यात मग कसं होणार..?
ज्योती वाघमारे - साहेब, आम्ही बाकिच्यांना देऊ पण प्रशासनाची जबाबदारी नाही का
जिल्हाधिकारी - प्रशासनाकडून आम्ही मदत करतोय. लोकांसाठी केंद्र उभारली आहे. १० किलो तांदूळ, १० किलो गहू देतोय, ३ दिवसांत ५ हजार त्यांच्या खात्यावर पाठवणार आहोत. ३ हजार लोकांसाठी तुम्ही २०० किट आणल्यात मग कशी मदत होईल मॅडम सांगा मला...
ज्योती वाघमारे - साहेब, वैयक्तिक मदत सगळ्यांना होणार आहे का...
जिल्हाधिकारी - नाही, नाही...तुम्हाला मदत वाढवावी लागेल. तुम्ही ऐका, मी जिल्हाधिकारी बोलतोय मला बोलू द्या
ज्योती वाघमारे - तुम्ही जिल्हाधिकारी आहात,म्हणून आमचे दु:खणं तुम्हाला सांगतोय...
जिल्हाधिकारी - मॅडम, ऐकून घ्या, ही ती वेळ नाही. प्रशासनाने काय केले, ते तुमचे राजकारण नको
ज्योती वाघमारे - आम्ही अजिबात राजकारण करत नाही
जिल्हाधिकारी - ऐकून घ्या, आता वेळ आहे, तिथे पुढे येऊन मदत करण्याची आहे.
ज्योती वाघमारे - मदत करण्यासाठी आलोय, साहेब
जिल्हाधिकारी - ३ हजार लोकांमध्ये तुम्ही २०० किट वाटतायेत आणि आम्हाला बोलत आहात. ३ हजार किट तयार करा, लवकर लोकांना द्या
ज्योती वाघमारे - आम्ही करू ना साहेब, आमच्या परीने जेवढे होतोय ते आम्ही करतोय
जिल्हाधिकारी - आम्ही पण ताकदीने प्रयत्न करतोय, पुरातून आम्हीच लोकांना बाहेर काढलंय, तुम्ही नाही काढले, त्यामुळे आता मदत वाढवा
ज्योती वाघमारे - हो, आम्ही आमची मदत वाढवतोय....असं सांगत वाघमारे यांनी फोन कट केला.
पाहा व्हिडिओ -
३ हजार लोकांसाठी २०० किट आणल्यात, तुम्ही मदत वाढवा...राजकारण करू नका, जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारेंना सुनावले #Solapur#EknathShindepic.twitter.com/2ApaUtkjEc
— Lokmat (@lokmat) September 29, 2025