अनोखा उपक्रम; मतदान करा म्हणून विद्यार्थी लिहिणार आई-बाबांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 20:11 IST2019-03-27T20:08:33+5:302019-03-27T20:11:50+5:30
मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत शाळकरी मुलांना आई-बाबांना पत्र लिहिण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

अनोखा उपक्रम; मतदान करा म्हणून विद्यार्थी लिहिणार आई-बाबांना पत्र
सोलापूर : मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत शाळकरी मुलांना आई-बाबांना पत्र लिहिण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत (स्वीप) टपालाद्वारे जनजागृती हा उपक्रम राबविण्याची कल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी मांडली.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा मतदार जनजागृती व शिक्षण समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण विभागांतर्गत सर्व शाळांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आई-बाबा मतदान करा, आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा, असा संदेश पत्रावरती लिहून पालक व कुटुंबीयांची सही घेऊन स्वीप समितीकडे पाठवायचे आहे.
तसेच या बैठकीत मतदार जनजागृती अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. सोलापूर आणि माढा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीवेळेस सुमारे साठ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रम राबवण्यात येत आहे. सध्या घंटागाडीद्वारे मतदान जागृती केली जात आहे.
आता नवमतदारांनी मतदान करावे, यासाठी खास उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या बैठकीला अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, देवदत्त गिरी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंखे, शिक्षणाधिकारी अशोक भांजे उपस्थित होते.