सोलापुरातील आंबेडकरवादी युवक संघटनांनी रोखली उद्यान एक्सप्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 15:13 IST2020-10-06T15:07:26+5:302020-10-06T15:13:22+5:30
हाथरस अत्याचारप्रकरणी व्यक्त केला निषेध; उत्तर प्रदेश सरकारविरूध्द जोरदार घोषणाबाजी

सोलापुरातील आंबेडकरवादी युवक संघटनांनी रोखली उद्यान एक्सप्रेस
सोलापूर : उत्तर प्रदेशातील हाथसर येथील युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापूर शहरातील आंबेडकरवादी युवक संघटनांनी रेले रोको आंदोलन केले. सोलापूरहून मुंबईकडे निघालेली उद्यान एक्सप्रेस शेटेवस्ती येथे १० मिनिटे रोखून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध नोंदविला.
योगी सरकारला या घटनेत सहआरोपी करून तिथल्या पोलिस प्रशासनाला व या षड्यंत्रात जे कोणी सामील आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावेत व पीडित युवतीला न्याय द्यावा. जोपर्यंत पीडितेला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंबेडकरवादी युवक संपूर्ण महाराष्ट्रात असेच आंदोलन करत राहणार, असा इशारा देत सोलापुरातील डेमोक्रॅटिक यूथ फ्रंट या आंबेडकरवादी संघटनेना दिला.
या वेळी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे जो घृणास्पद प्रकार घडला आहे, आमच्या भगिनीवर बलात्कार करून तिच्या परिवारातील सदस्यांच्या परवानगीविना तिच्यावर परस्पर अंतिम संस्कार करून संविधानाला गालबोट लावण्याचा लांच्छनास्पद प्रकार घडला आहे. योगी व मोदी सरकार तेथील बहुजनांचा आवाज दाबू पाहात आहे. पीडित युवतीला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत राज्यभरात असेच तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सदरचे रेल रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी सत्यजित वाघमोडे, अतिष बनसोडे, सोहन लोंढे, अनुराग सुतकर, सुमित शिवशरण, मनोज भालेराव, आकाश साबळे, अक्षय चंदनशिवे, अभी शिंगे, सिध्दांत नागटिळक व डेमोक्रेटीक युथ फ्रंट, सोलापूरचे शेकडो तरूण कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले़
-----------
आंदोलकांना घेतले ताब्यात...
या ठिकाणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व स्थानिक पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांनी थांबवलेली उद्यान एक्स्प्रेस लगेच मुंबईकडे रवाना करण्यात आली. यासंबंधी अधिक माहिती घेऊन आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली.