आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं सीना व भीमा नदीला महापूर आला आहे. शिवाय भोगावती नागझरी व चांदणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने हाती आलेले पिक पाण्यात गेल्याने शेतकरी निराश झाला आहे. दरम्यान, आता पिके पाण्यात वाहून गेल्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे.
कारी (ता बार्शी) येथील तरुण शेतकरी शरद भागवत गंभीर (वय ३९) याने घराजवळ असणाऱ्या शेलवटीच्या झाडाला गळफास घेऊन जीव संपवले. शेती खर्चासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचंय या विवंचनेत शरद होता. परिणामी त्याने बुधवारी सकाळी घराजवळ असणाऱ्या शेलवटीच्या झाडाला गळफास घेतला. याबाबतची फिर्याद चुलत भाऊ गजानन गंभीर याने पांगरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल माने हे करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत दहिटणे येथील शेतकरी लक्ष्मण काशिनाथ गावसाने यांनी गळफास घेवून संपवले जीवन संपविले. या दोन्ही घटनांमुळे बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही घटनांची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.