Tourists will move in 4 divisions within the city in 200 days: Srikancha Yannam | सव्वीस दिवसांमध्ये शहरातील २६ प्रभागांत फिरणार : श्रीकांचना यन्नम
सव्वीस दिवसांमध्ये शहरातील २६ प्रभागांत फिरणार : श्रीकांचना यन्नम

ठळक मुद्दे पहिले काम हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे - यन्नमशहरातील गावठाण भागात स्मार्ट सिटीची कामे होत आहेत - यन्नमहद्दवाढ भागातील समस्या सोडविण्यावर भर देणार - यन्नम

सोलापूर : शहरात येत्या २६ दिवसांत २६ प्रभागांत फिरून लोकांचे प्रश्न समजावून घेणार असल्याचा संकल्प नूतन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.

महापौर निवड झाल्याप्रीत्यर्थ श्रीकांचना यन्नम यांनी गुरूवारी सायंकाळी ‘लोकमत भवन’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत महिला व बालकल्याण सभापती रामेश्वरी बिर्रू, नगरसेविका राधिका पोसा, रमेश यन्नम, दत्तात्रय पोसा, यशवंत पात्रुड, श्रीगणेश बिराजदार उपस्थित होते. महापौर यन्नम यांनी पहिले काम हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे करणार असल्याचे सांगितले. हद्दवाढ भागात अपरात्री पाणी येते. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. ही समस्या पहिल्यांदा सोडविणार आहे. 

शहरातील गावठाण भागात स्मार्ट सिटीची कामे होत आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. ही कामे पूर्ण करून घेण्याबरोबर हद्दवाढ भागातील समस्या सोडविण्यावर भर देणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर राहील, याकडे कटाक्ष असणार आहे. रस्ते, ड्रेनेज आणि महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे. हे काम तर मी प्राधान्याने करणार आहेच, पण लोकांच्या मनात नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील २६ दिवस २६ प्रभागात फिरणार आहे. लोकांनी भेटायला येताना किमान एकतरी सूचना करावी. समस्यांचा पाढा वाचण्याऐवजी काय करता येते हे सांगितले तर उपाययोजना करणे सोपे होणार आहे. 

महापालिकेचा कारभार सर्वांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे महापौर यन्नम यांनी सांगितले. भाजपमध्येच दोन गट आहेत, सभागृहात कामकाज करू देतील काय, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, चार वेळा निवडून आले आहे. सर्वांचे सहकार्य राहिले आहे. महापौर निवडणुकीच्या वेळीच हा चमत्कार सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे मला सर्वांची साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिवहनला देणार ऊर्जितावस्था
- शहरातील गरिबांच्या सेवेत असणारी सिटी बस महापालिकेची आहे. त्यामुळे परिवहनला ऊर्जितावस्थेत आणण्यावर आपला भर राहील, असे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले. देसाई नगराला पहिली बस मी सुरू केली. मी बसमध्ये फिरत होते. लोक माझं नाव घेऊन बस सुरू केल्याचे श्रेय द्यायचे. पण ती नगरसेविका मीच आहे हे त्यांना माहीत नसायचे. लोकांच्या या प्रतिक्रिया ऐकून मला बरे वाटायचे. आता बससेवा सुरळीत नाही. ती सुरळीत कशी होईल, याकडे मी लक्ष देणार आहे. 

Web Title: Tourists will move in 4 divisions within the city in 200 days: Srikancha Yannam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.