आॅनलाईन तंत्राद्वारे सोलापूरातील डॉक्टरला ४.७० लाखांस गंडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:18 IST2018-07-04T13:14:41+5:302018-07-04T13:18:11+5:30
विश्वासाने गुंतवणूक केलेल्या पॉलिसीचा कालावधी पूर्ण केल्याचे भासवून आॅनलाईन तंत्राचा वापर करून डॉक्टरला गंडवल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे.

आॅनलाईन तंत्राद्वारे सोलापूरातील डॉक्टरला ४.७० लाखांस गंडवले
सोलापूर: विश्वासाने गुंतवणूक केलेल्या पॉलिसीचा कालावधी पूर्ण केल्याचे भासवून आॅनलाईन तंत्राचा वापर करून डॉक्टरला गंडवल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. जानेवारी २०१८ ते ९ एप्रिल २०१८ या कालावधीत ७/८, उत्तर सदर बझार, विद्यानगर, सोलापूर व बँक आॅफ महाराष्टÑ, अशोक चौक, सोलापूर परिसरात ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यातील फिर्यादी डॉ. अब्दुल बुर्जुगसाहब पटवेगर (वय ६४, सोलापूर) यांना आरोपी जगमोहन दास, अलोकिया शर्मा, इन्कमटॅक्स आॅफिसर गुप्ता या तिघांनी मिळून विश्वासात घेऊन त्यांनी गुंतवणूक केलेल्या पॉलिसीचा कालावधी संपल्याचे भासवले. पॉलिसीचे उर्वरित हफ्ते व जीएसटीची रक्कम भरण्यास भाग पाडले.
यानंतर वेळोवेळी मोबाईल व व्हॉट्सअॅप तंत्राचा वापर करून फिर्यादीकडून आयडीबीआय बँक अहमदाबाद बँकेच्या अकौंटवर एकूण ४ लाख ७० हजार ७८७ रुपये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. संबंधित प्रकारात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. अब्दुल पटवेगर यांनी जेलरोड पोलिसांकडे संपर्क साधून तिघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास फौजदार बेंबडे करीत आहेत.