प्रतिक्षा संपली; सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू हवाईसेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:28 IST2025-09-19T20:28:15+5:302025-09-19T20:28:29+5:30
या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे.

प्रतिक्षा संपली; सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू हवाईसेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार !
सोलापूर : सोलापूरकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या १५ ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर, वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल आहे असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मिडियावरून ही माहिती दिली.
या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे. दोन्ही विमानसेवांचं बुकिंग २० सप्टेंबर, २०२५ पासून सुरू होणार आहे. मुंबई आणि बंगलोर या दोन सेवा सुरु होणे, हा सोलापूरच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. ‘सोलापूरसारख्या ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई व बंगळुरूशी जोडणं ही काळाची गरज होती. या हवाईसेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहेच, शिवाय या भागात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे.