Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
By आप्पासाहेब पाटील | Updated: November 22, 2025 17:48 IST2025-11-22T17:46:08+5:302025-11-22T17:48:07+5:30
क्रुझर जीपचा टायर फुटल्याने अपघात झाला.

Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
सोलापूर: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझर जीपला टायर फुटून देवदर्शनापूर्वीच झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. ही दुर्घटना हैदराबाद रस्त्यावरील चिवरी फाट्याजवळ शनिवारी घडली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊळेगाव येथील भाविक आणि त्यांचे पुणे येथील हडपसरचे नातेवाईक देवदर्शनासाठी क्रुझर जीपने( एमएच २४/ व्ही ४९४८) नळदुर्गकडील खंडोबा मंदिराकडे निघाले होते.
सोलापूर : जीपचे टायर फुटल्याने अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी pic.twitter.com/mR7U0QRC9K
— Lokmat (@lokmat) November 22, 2025
कुणाल लक्ष्मण भिसे (वय- ३२ वर्षे), अंजली रवी अमराळे (वय- १५ वर्षे), आकाश दत्ता कदम (वय-२५ वर्षे, सर्व रा. हडपसर), ओमकार हरी शिंदे राहणार (वय -१० वर्ष), रुद्र हरी शिंदे (वय-१२वर्षे ), बालाजी पांडुरंग शिंदे ( वय - ४७ वर्ष, सर्व राहणार ऊळेगांव), माऊली कदम ( वय ३० वर्षे, रा. हडपसर), हरी बाळकृष्ण शिंदे( वय- ३६ वर्ष, राहणार-ऊळे), कार्तिक रवींद्र आमराळे ( वय -१३ वर्षे,) आणि कार्तिकी रवींद्र आमराळे (वय- १५ वर्ष) आणि शिवांश माऊली कदम (वय- १ वर्षे, सर्व रा. हडपसर), श्लोक हरी शिंदे वय- ८ वर्ष, राहणार, ऊळे) अशी जखमींची नावे आहेत.
त्यांच्या जीपचे पुढील टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला तर इतर १२ जण जखमी झाले. पुजा हरी शिंदे (वय- ३० वर्ष, राहणार-ऊळेगांव), सोनाली माऊली कदम (वय- २२ वर्ष, राहणार-हडपसर), साक्षी बडे वय १९ वर्षे, राहणार-हडपसर) अशी मृतांची नावे असल्याचंही सांगण्यात आलंय.
या अपघातास कारणीभूत ठरलेल्या क्रुझर जीपला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने जीपचे टायर फुटल्याचं सांगण्यात आलंय. या सर्व जखमींना मदतनीस राजू वडवेराव आणि प्रहार संघटनेचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलंय.