Ashadhi Ekadashi : अवघे गर्जे पंढरपूर, चंद्रभागेतीरी जमला 10 लाख वैष्णवांचा मेळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 11:22 IST2018-07-23T09:48:35+5:302018-07-23T11:22:08+5:30
Ashadhi Ekadashi : विठू-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या या दैदिप्यमान सोहळ्याने अवघी पंढरी विठुनामाच्या जयघोषात दुमदुमल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Ashadhi Ekadashi : अवघे गर्जे पंढरपूर, चंद्रभागेतीरी जमला 10 लाख वैष्णवांचा मेळा
मुंबई - आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपुरात भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर वाळवंटात हरीनामाचा गजर करत वारकऱ्यांनी दर्शन रांगेकडे प्रस्थान केले आहे. आज विठू-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
विठ्ठलभेटीच्या ओढीने गेल्या महिनाभरापासून उन,पाऊस आणि वाऱ्याची तमा न बाळगता विठ्ठलनामाचा जप करत पंढरीच्यादिशेने चालणारी पाऊले आज पंढरपूरात पोहोचली आहेत. तर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा माऊलींच्या पालखींचेही पंढरपूरात आगमन झाले असून लाखो वारकऱ्यांची पाऊले चंद्रभागेतीरी विसावली आहेत. चंद्रभागेला भरपूर पाणी असून निर्मळ आणि स्वच्छ चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविक नदीपात्रात उतरले आहेत. टाळ, मृदंगाच्या गजरात पंढरीत विठूरायाचा जप सुरु आहे. अवघी पंढरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली असून चोहीकेड वारकरीच दिसत आहेत. बा विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरीच्या तीवावर बहुतांश वारकरी जमले आहेत. तर विठ्ठलभेटीची ओढ लागलेले भाविक दर्शन रांगेत उभे आहेत.