सोलापुरात भरदिवसा गॅरेजसमोर टेम्पो जळून खाक; अग्निशामक दलामुळे आग नियंत्रणात

By विलास जळकोटकर | Updated: February 24, 2025 18:38 IST2025-02-24T18:38:10+5:302025-02-24T18:38:47+5:30

सर्व्हिस रोडवर अजूनही अतिक्रमण

Tempo burnt down in front of garage in broad daylight in Solapur; Firefighters bring fire under control | सोलापुरात भरदिवसा गॅरेजसमोर टेम्पो जळून खाक; अग्निशामक दलामुळे आग नियंत्रणात

सोलापुरात भरदिवसा गॅरेजसमोर टेम्पो जळून खाक; अग्निशामक दलामुळे आग नियंत्रणात

विलास जळकोटकर, सोलापूर : सोलापूर-हैदराबाद रस्त्यावर दुरुस्तीसाठी गॅरेजसमोर पार्क केलेल्या आयशर टेम्पोने अचानक पेट घेतला. या आगीत टेम्पो जळून खाक झाला. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन गाड्या पाणी मारून आग नियंत्रणात आणली. मात्र सर्व्हिस रोडवर अद्यापही अतिक्रमण दिसून येत आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्ग गेल्या काही दिवसांपासून घात-अपघाताच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी बल्करच्या अपघातात तिघांचा बळी गेला. यानंतर आता टेम्पो पेटण्याची घटना घडल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

हैदराबाद रोडवर असलेल्या गॅरेजमध्ये हा टेम्पो दुरुस्तीसाठी पार्क केला होता. सोमवारी दुपारी त्या टेम्पोने अचानक पेट घेतला. त्यावेळी रोडवर बघ्यांची एकच गर्दी उसळली. नागरिक मोबाइलमध्ये चित्रीकरण करत होते. आगीच्या घटनेनंतर बराचवेळाने ही बाब अग्निशामक दलास कळविण्यात आली असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. माहिती मिळाल्यानंतर काही वेळात दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन गाडी पाणी मारून आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत टेम्पोचा संपूर्ण टेम्पो जळाला होता. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू होते.

वाहतूक वळविण्यात आली

हैदराबाद रस्त्यावर उभारलेल्या टेम्पोला आग लागल्याने त्या बाजूंनी जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. आग पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल अग्निशामक दलाच्या पथकाकडून सांगता आले नाही. पोलिस नेमक्या कारणाचा शेाध घेत आहेत.

सर्व्हिस रोडवर गॅरेजसमोर अजूनही वाहने

सर्व्हिस रोडवरील वाहनामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताला निमंत्रण मिळते याबद्दल ‘लोकमत’मधून प्रकाश टाकण्यात आला. त्यानंतरही वाहने उभी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याकडे वाहतूक शाखेसह महामार्ग प्राधिकरणाने लक्ष द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

नोटिसांचा काय झालं?

बल्कर अपघातानंतर सर्व्हिस रोडवरील वाढत्या अतिक्रमणाबद्दल ‘लोकमत’ ने प्रकाश टाकून याबद्दल महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता. यावर संबंधितांना नोटिसा बजावणार असल्याचे सांगण्यात आले होते, त्याचे काय झाले? असा सवाल वाचकांडून ‘लोकमत’कडे करण्यात आला.

Web Title: Tempo burnt down in front of garage in broad daylight in Solapur; Firefighters bring fire under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.