सोलापुरातील पोलिसाच्या आईला शिक्षकाने फसविले; कारण ऐकून व्हाल अवाक्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 13:05 IST2020-09-04T13:03:13+5:302020-09-04T13:05:33+5:30
मुलीला नोकरी लावण्याचे आश्वासन : शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा

सोलापुरातील पोलिसाच्या आईला शिक्षकाने फसविले; कारण ऐकून व्हाल अवाक्
सोलापूर : शाळेत शिपाई या पदावर मुलीला नोकरी लावतो असे सांगून पोलीस कर्मचाºयाच्या आईला फसवल्याप्रकरणी शिक्षकासह तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा व शिक्षक या दोघांना अटक करण्यात आली आहे.
सुहास रेवण दलाल, अंजली सुहास दलाल, मुलगा शुभम सुहास दलाल (सर्व रा. उमानगरी, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सिंधूबाई देवराम पाडवी (वय ५८, रा. उमानगरी, मुरारजी पेठ) घरी एकट्याच राहतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. गीता देविदास राऊत (रा.चिंचोळीकाटी, ता. मोहोळ) हिच्या नोकरीसाठी सिंधूबाई पाडवी या प्रयत्न करीत होत्या. मे २०१८ मध्ये सुहास दलाल व त्याची पत्नी अंजली दलाल हे दोघे सिंधूबाई पाडवी यांच्या घरी आले.
सुहास दलाल याने मी नोकरी करत असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील श्री पंचलिंगेश्वर हायस्कूलमध्ये शिपाई या पदावर तुमच्या मुलीला कामाला लावतो. माझे व संस्थापकाशी चांगले संबंध आहेत. शाळेत एक मागासवर्गीय पदाची जागा रिक्त आहे. पण त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले. सिंधूबाई पाडवी यांनी नोकरीसाठी किती पैसे लागतील, अशी विचारणा केली, तेव्हा त्यांनी आम्ही संस्थाचालकांना विचारुन कळवितो असे सांगून निघून गेले. दोन दिवसानंतर शिक्षकाने सिंधूबाईला सहा लाख ४० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. २९ मे २०१८ रोजी सुहास दलाल, अंजली दलाल व त्यांचा मुलगा शुभम दलाल यांच्याकडे पैसे दिले. पैसे दिल्यानंतर सुहास दलाल व त्यांचे कुटुंबीय घर सोडून तिथून निघून गेले.
सावकारी गुन्ह्याची धमकी
सिंधूबाई पाडवी पैसे परत मागितले असता शिक्षक दलाल याने तुमचा मुलगा पोलीस खात्यामध्ये नोकरीला आहे. तुमच्यावर सावकारीची केस घालून मुलाची नोकरी घालवतो अशी उलट धमकी दिली होती.