चोरीची बाइक विकण्यासाठी चौपाटीवर थांबले; पोलिसांनी झडप घालून दोघांना पकडले
By शीतलकुमार कांबळे | Updated: November 10, 2023 19:41 IST2023-11-10T19:40:58+5:302023-11-10T19:41:20+5:30
शहरात वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाकडून धडक मोहीम हाती घेतली.

चोरीची बाइक विकण्यासाठी चौपाटीवर थांबले; पोलिसांनी झडप घालून दोघांना पकडले
सोलापूर : पूर्व भागातील चौपाटीवर एका बाइकवर दोघे चोरीची बाइक विकण्यासाठी थांबल्याची खबर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली अन् सापळा लावून दोघांनाही पकडून त्यांच्याकडील आणखी पाच बाइकसह सहा गुन्हे उघडकीस आणले. सिद्दीक अब्दुल सत्तार शेख (वय ३०) व जावीद हुसेन नदाफ (वय ३०, दोघे रा. सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याशिवाय घरफोडीतील आणखी दोघांना पकडून त्यांच्याकडून ३ लाख ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहरात वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाकडून धडक मोहीम हाती घेतली. काही बातमीदार कामाला लावले. त्यांच्यामार्फत एका बाइकवर दोघे पूर्व भागातील चौपाटीवर येत असल्याची माहिती मिळताच सापळा लावण्यात आला, येथे वरील दोघे गिऱ्हाईकांची वाटप पाहत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेतले.
सखोल तपास केला असता दोघांनी जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन, विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन, सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा पाच बाइक चोरल्याचे कबूल केले. यातील दोन दुचाकी त्यांनी त्याच्या साथीदाराला विकल्याचे सांगितले. त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.