कट मारल्याचा जाब विचारल्याने चाकूने वार; चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:14 IST2025-01-23T10:13:53+5:302025-01-23T10:14:22+5:30
सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर इथं ही घटना आहे. तरुणाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कट मारल्याचा जाब विचारल्याने चाकूने वार; चौघांवर गुन्हा दाखल
Sangola Crime: दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून चिडून चौघांनी मिळून शिवीगाळ, दमदाटी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने डोक्यात मारून तरुणाला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवार, २० रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथे घडली. याबाबत, जखमी सचिन सुभाष हिप्परकर यांनी फिर्याद दिली.
याप्रकरणी लक्ष्मण बाळू शिंदे, कुंडलिक बाळू शिंदे (दोघेही रा. लक्ष्मीनगर), कुणाल विजय कांबळे, दत्ता संजय माने (दोघेही रा. महूद (ढाळेवाडी) ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे सोमवारी सकाळी ९:३० च्या सुमारास दुचाकीवरून मुलीला शाळेत सोडण्यास गेले होते. त्यावेळी फिर्यादीच्या दुचाकीला आरोपीच्या दुचाकीने कट मारल्याने फिर्यादीने त्याला जाब विचारला असता, आरोपीने हुज्जत घातली. दरम्यान, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र दादा बाड यांनी घडल्या प्रकारावर वाद नको म्हणून त्याच्या घरी गेले असता, आरोपींनी त्याठिकाणी येऊन फिर्यादीला शिवीगाळ केली. 'तुला लय माज आला आहे का? तुला बघतोच', असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी फिर्यादीला पकडून चाकूने डोक्यात मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.