रात्रीचे सोलापुरी व्हिलन...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 10:55 IST2019-10-11T10:55:19+5:302019-10-11T10:55:44+5:30

आपल्या बुद्धीचा वापर करून योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

Solapuri villain of the night ...! | रात्रीचे सोलापुरी व्हिलन...!

रात्रीचे सोलापुरी व्हिलन...!

वास्तविक पाहता सोलापूरच्या रस्त्यावर रात्री बारानंतर फिरणे हे कोणा येरागबाळ्याचे काम नाही. रस्त्यावर शुकशुकाट पसरला की लगेच त्या रस्त्याचा, चौकीचा ताबा तेथील भटकी कुत्री घेतात. त्यांच्या मतदारसंघात बाहेरचा कोणी आलेला त्यांना कदाचित आवडत नसावा. रस्त्याने येणाºया जाणाºया प्रत्येकावर ते भुंकल्याशिवाय राहत नाहीत. त्यातूनही आपण दुचाकीवर असलो तर आपला पाठलाग होणार हे ठरलेलेच.

असाच अनुभव मला काही दिवसांपूर्वी आला. मी माझ्या कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. परतायला रात्रीचे दहा वाजणार होते. म्हणजे फारसा प्रॉब्लेम नव्हता पण काही वेळेस आपले नशीब खराब असेल तर त्याला कोण काय करणार? मी रेल्वेत बसलो. पण नंतर काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रात्री दहा वाजता सोलापूरला पोहोचणारी गाडी रात्री एक वाजता पोहोचली. स्टेशनवर असलेली वर्दळ सोडली तर बाकी सगळीकडे अगदी शुकशुकाट होता. मी स्टेशनमधून बाहेर पडून पार्किंगला लावलेली माझी दुचाकी काढली. भैय्या चौक मार्गे घरी जाण्यासाठी निघालो. मनात म्हटले... ‘यार... रस्त्यावर तर एक कुत्रंही दिसत नाहीये..’ पण मनातील विचार पुरेसा संपलाही नव्हता की तो किती चुकीचा होता याचा प्रत्यय आला. पुढील चौकात दहा-पंधरा कुत्र्यांचे टोळके दिसले. वर्तमानपत्रातील बातम्या डोळ्यासमोर आल्या आणि मनात भीतीने प्रवेश केला. आपोआपच गाडीचा वेग काहीसा वाढला तसा त्या कुत्र्यांना माझा संशय आला असावा.

त्यातील सात-आठ कुत्री माझ्या दिशेने भुंकत येऊ लागली. ते पाहून बाकीचे तरी का मागे राहतील? त्यांनीही जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. मला तरी ती कुत्री अगदी चित्रपटात नायकाला मारण्यासाठी सात-आठ व्हिलन ज्या स्थितीमध्ये उभारतात तशी भासू लागली. मी माझ्या गाडीचा वेग अजून वाढवला आणि कुणा कुत्र्याला माझ्या पायाचा चावा घेता येऊ नये म्हणून मी माझे दोन्ही पाय वर उचलले. एकतर त्या कुत्र्यांनी तीन बाजूने मला घेरून पाठलाग करायला सुरुवात केली़ त्यामुळे मी अजूनच घाबरलो आणि परिणामी गाडीचे संतुलन बिघडले. काही क्षणातच मी गाडीसहित रस्त्यावर पडलो. मी पडलेला पाहताच ‘आपण सफल झालो’ या आनंदात म्हणा किंवा घाबरून म्हणा... माझ्यामागे लागलेली कुत्री मागच्या मागे गायब झाली. मला तर त्याही स्थितीत गाडीवरून पडल्यापेक्षा कुत्री पळून गेल्याचा जास्त आनंद झाला. अर्थात गाडीवरून पडल्याने माझ्या दोन्ही गुडघ्यांना जबर मार बसला होता. 

रात्री-अपरात्री घराबाहेर पडण्याचे अनेक प्रसंग आले. रात्री प्रवास करण्याचा प्रसंग आला तर अक्षरश: अंगावर काटे येतात़
एकदा मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेलो असताना आमच्या समोरून दोन-चार कुत्री जोरजोरात भुंकत आमच्या समोरून गेली. कुत्र्यावरून आमची चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण रात्री दुचाकीवर प्रवास करताना कुत्र्यांचा आलेला अनुभव सांगत होता. मी माझ्या मित्रांना माझ्यासोबत घडलेली घटना सांगितली आणि म्हणालो, ‘अरे यार, परवा तर मी मरता-मरता वाचलो. दहा-बारा कुत्र्यांनी मिळून माझे लचकेच तोडले असते. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो.’ त्यावर कायम कामानिमित्त रात्री प्रवास करणारा माझा मित्र आत्मविश्वासाने म्हणाला, ‘अरे मित्रा...! जेव्हा आपण दुचाकीवर असताना आपल्या मागे कुत्री लागली तर आपल्या वाहनाचा वेग कमी करायचा आणि त्यांच्याजवळ जाऊन आपली दुचाकी थांबवायची. मग ती भुंकायचे थांबवून निघून जातात. हा माझा अनुभव आहे.’ त्यानंतर प्रत्येकजण विविध उपाययोजना व आपले अनुभव सांगू लागला. ते सर्व उपाय ऐकून मी थक्कच झालो. 

पण मला विचाराल तर, काहीही झाले तरी ते जनावरच. त्याच्यावर किती विश्वास ठेवता येणार आपल्याला? त्यामुळे रात्री प्रवास करणे शक्यतो टाळलेलेच बरे. अगदीच टाळणे अशक्य असेल तर मात्र आपल्या बुद्धीचा वापर करून योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तरच या ‘रात्रीच्या व्हिलन’कडून आपण सुखरुपपणे सुटू शकतो.
- डॉ. राजदत्त रासोलगीकर
(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)  

Web Title: Solapuri villain of the night ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.