सोलापूर टॉवेल कारखाना आग: तिघांचे मृतदेह बाहेर काढले, मालक व कुटुंबीय अद्याप आत अडकले
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 18, 2025 14:33 IST2025-05-18T14:33:07+5:302025-05-18T14:33:57+5:30
आग अजूनही आटोक्यात नाही, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

सोलापूर टॉवेल कारखाना आग: तिघांचे मृतदेह बाहेर काढले, मालक व कुटुंबीय अद्याप आत अडकले
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: शहरातील अक्कलकोट रोड MIDC भागात एका टॉवेल कारखान्याला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र टॉवेल कारखान्याचे कुटुंबीय आत अडकल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार महताब बागवान, आशा बागवान, सलमान बागवान या तिघांचे मृतदेह सापडले आहेत.
कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी व त्यांचा मुलगा अनस मन्सुरी कुटुंबासोबत कारखान्याच्या आत अडकले आहेत. सामाजिक कार्यकर्ते खालिद मणियार यांना अनस मन्सुरी यांच्या मेहुण्याचा पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फोन आला होता. कारखान्याला भीषण आग लागली आहे. आमचे सर्व कुटुंब बाथरूममध्ये अडकले आहेत. आम्हाला वाचवा असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मात्र, कारखान्याचे मालक मन्सुरी व त्यांचे कुटुंबीय आतच अडकले आहेत.
दरम्यान, पहाटे लागलेली आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. सोलापूर, पंढरपूर, बार्शी या भागातील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली असून महापालिका, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर ठाण मांडून आहेत. क्रेन, जेसीबीच्या मदतीने पाण्याचा मारा करण्यात येत आहे.