'गेमचेंजर' स्टेटस भोवलं, माजी मंत्र्यांनी दिली गोळी घालण्याची धमकी; शिंदेसेनेत लाडक्या बहिणीचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:14 IST2026-01-21T13:12:24+5:302026-01-21T13:14:12+5:30

सिद्धाराम म्हेत्रेकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिंदेसेनेच्या महिला संपर्क प्रमुखाने केला आहे.

Solapur Siddharam Mhetre threatened to kill me alleges the women contact head of the Shinde faction of Shiv Sena | 'गेमचेंजर' स्टेटस भोवलं, माजी मंत्र्यांनी दिली गोळी घालण्याची धमकी; शिंदेसेनेत लाडक्या बहिणीचा संताप

'गेमचेंजर' स्टेटस भोवलं, माजी मंत्र्यांनी दिली गोळी घालण्याची धमकी; शिंदेसेनेत लाडक्या बहिणीचा संताप

Siddharam Mhetre: माजी मंत्री आणि शिंदेसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्षाच्या उमेदवारीवरून आपल्याला गोळी घालून जिवे मारण्याची धमकी दिली आहे असा आरोप शिंदेसेनेच्या महिला संपर्कप्रमुख अनिता माळगे यांनी केला आहे. 

अनिता माळगे या बोरामणी गटातून इच्छुक होत्या. या जागेवर म्हेत्रे समर्थक धनेश आचलारे प्रमुख दावेदार होते. माळगे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन आपली उमेदवारी पक्की करत ए.बी. फार्म आपल्याला मिळाल्याचा दावा करीत म्हेत्रे आणि शिंदेसेनेचे नेते महेश साठे यांनी एबी देण्यास विरोध केला. सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांच्यामार्फत आपल्यावर दबाव आणला. त्यांच्या खास माणसानेच निवडणूक लढवावी या हेतूने मला दमदाटी करण्यात आली असा आरोप माळगे यांनी केला.

मी सिद्धाराम म्हेत्रे यांना शिंदेसेनेत प्रवेश मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे प्रयत्न केला होता. आता म्हेत्रे यांनी माझ्यावरच अन्याय केला आहे. लाडक्या बहिणीवर हा अन्याय असून, मी तो सहन करणार नाही, असं अनिता माळगे यांनी म्हटलं.

'गेमचेंजर'स्टेटस भोवले 

अनिता माळगे यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर "गेमचेंजर" असे स्टेटस ठेवले होते. याच स्टेटसमुळे सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्याला लक्ष्य केले. त्याच दिवसापासून आपल्याला उमेदवारी मिळू नये असे प्रयत्न केले. मी हट्टाला पेटल्याने माझ्यावर दबाव आणण्यासाठी दमबाजी, जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे अनिता माळगे यांचा आरोप आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांनी मला गोळी घालून तसेच गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी दिली. तिला ऑफिसकडे येऊ देऊ नका असे बजावले. याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत असेही अनिता माळगे यांनी सांगितले. आपल्याला उमेदवारी मिळणार नाही तरीही या अन्यायाविरोधात आपण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

माळगेंमुळेच शिंदेसेनेत प्रवेश- सिद्धाराम म्हेत्रे

"अनिता माळगे यांना धमकी दिली नाही. निवडून येण्याच्या क्षमतेवर धनेश आचलारे यांची उमेदवारीसाठी शिफारस केली. अचलारे अनेक वर्षे काम करतात. माळगे या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांच्यामुळेच मला शिंदेसेनेत प्रवेश मिळाला हे खरे. म्हेत्रे कुटुंब महिलांचा आदर राखते. अनिताताई आमच्या लाडक्या बहीण आहेत. त्यांचा गैरसमज झाला असावा. आम्ही त्यांची समजूत काढू," अशी प्रतिक्रिया सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.
 

Web Title : पूर्व मंत्री ने महिला नेता को टिकट पर जान से मारने की धमकी दी

Web Summary : शिंदे सेना की नेता अनिता मालगे ने पूर्व मंत्री सिद्धाराम म्हेत्रे पर पार्टी उम्मीदवारी को लेकर धमकी देने का आरोप लगाया। मालगे का दावा है कि म्हेत्रे ने एकनाथ शिंदे से समर्थन मांगने के बाद अन्य लोगों के साथ मिलकर उनके नामांकन का विरोध किया। म्हेत्रे ने धमकियों से इनकार किया है।

Web Title : Ex-Minister Threatens to Kill Female Party Leader Over Ticket

Web Summary : Shinde Sena leader Anita Malge accuses ex-minister Siddharam Mhetre of threatening her over party candidacy. Malge claims Mhetre, backed by others, opposed her nomination after she sought support from Eknath Shinde. Mhetre denies threats, citing another candidate's merit.