Solapur Crime: मुलांच्या आणि त्यांच्या सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ७५ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आयुष्याला पूर्णविराम दिला. बसवेश्वर इरप्पा रासुरे (रा. मंगळवार पेठ), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (१८ ऑगस्ट) रोजी घडली.
बसवेश्वर हे सोमवारी सकाळी राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. ही घटना मयत बसवेश्वर यांच्या पत्नीने पहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
त्यांनी याची माहिती नातेवाइकांना दिली आणि त्यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिस ठाणे हद्दीतील हवालदार एन. बी. भोगशेट्टी यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाइकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवले.
त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
चिठ्ठीत तिघांची नावे
मृत बसवेश्वर यांच्या जवळ एक चिठ्ठी सापडली असून, त्यात तिघांची नावे आहेत. तिघांत दोन मुलांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून, चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.