सोलापूर डॉक्टर आत्महत्या प्रकरण: मनीषा मानेच्या घराची झडती घेतली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:09 IST2025-04-26T15:09:05+5:302025-04-26T15:09:58+5:30
डिसेंबर २०२४ पासून अधिकार काढून घेतल्यामुळे मनीषाने चिडून तक्रारीचा मेल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोलापूर डॉक्टर आत्महत्या प्रकरण: मनीषा मानेच्या घराची झडती घेतली, पण...
सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी मनीषाने डॉक्टरांना चिठ्ठी पाठविली होती. घटनेपूर्वी वळसंगकरांनी तिला हॉस्पिटलमधील आपल्या दालनात बोलावून चर्चा केली होती. त्यानंतर तिने चिठ्ठी फाडली. ती मिळविण्यासाठी हॉस्पिटल आणि मनीषाच्या जुळे सोलापुरातील घराची झडती घेण्यात आली; पण चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिस सूत्राने स्पष्ट केले.
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचे अनाकलनीय गूढ निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या मनीषाला २३ एप्रिलपर्यंत आणि त्यानंतर २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. दोन दिवसांच्या वाढीव कोठडीत तपासात मनीषाने कोणतीही माहिती देण्यास सहकार्य केले नाही. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या जबानी घेतल्या. डिसेंबर २०२४ पासून अधिकार काढून घेतल्यामुळे मनीषाने चिडून तक्रारीचा मेल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयास्पद नाही आढळले
मनीषाला गुरुवारी वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा मनीषाच्या स्वाक्षरीचे कागदपत्र, ई-मेलचे प्रिंट आऊट जप्त केले. शिवाय डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे कागदपत्रही मिळाले. मात्र, मनीषाने जो माफीनामा दिला होता ती चिठ्ठी अन् संशयास्पद अन्य काही शोधण्यासाठी पोलिसांनी तिचे घर अन् हॉस्पिटल गाठले होते; पण काही हाती लागले नाही.
उपाशी राहू नको!
मनीषाची पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला आज कोर्टात आणले. कोर्टरूममधील प्रक्रिया झाल्यानंतर न्यायालयातून पुन्हा कोठडीत नेण्यासाठी पोलिसांनी मनीषा व्हॅनमध्ये बसविले तेव्हा पोलिस गाडीत बसताना तिची दोन मुले, मनीषाची आई संजूबाई अन्य नातलगांनी तिच्याशी काही मिनिटे संवाद साधला. मनीषाची आईनं 'तिला उपाशी राहू नको, जेवण व्यवस्थित कर' असा सल्ला दिला. यावर मनीषानंही 'माझी काही काळजी करू नका' असे उत्तर देत सर्वांना धीर दिला.