सोलापुरात वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना मुलाचाही अपघातात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावरील वरकुटे येथे आज (१४ मे २०२४) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात इतर चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हर्षद झंकर योगी (वय, ३५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथील योगी कुटुंब बंगळुरू येथे गेले होते. काम आटोपून ते पुन्हा आपल्या गुजरातकडे येत असताना झंकर यांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. दरम्यान, झंकर यांच्यावर अत्यंसस्कार करून योगी कुटुंब परत गावी गुजरातकडे निघाले. परंतु, वरकुटे गावाजवळ काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांची गाडीने रस्त्याच्या कडेला असलेला झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातात झंकर यांचा मोठा मुलगा हर्षद यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण गंभीर जखमी झाली.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती या अपघाताची माहिती दिली. अपघातग्रस्त गाडीमधील जखमींना बाहेर काढून तात्काळ करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.