ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
By आप्पासाहेब पाटील | Updated: October 3, 2025 23:49 IST2025-10-03T23:48:55+5:302025-10-03T23:49:45+5:30
अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना दिला दिलासा

ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: माढा तालुक्यातील केवड व वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गावं असून, पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झालेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टर मधून गावांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले तसेच पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आली, अनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचे दिसून आले, असे सर्व शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांनी त्यांना धीर दिला. सर्व प्रशासन आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी घरांचे नुकसान, जनावरांचे नुकसान याची माहिती घेतली. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांची विचारपूस केली असता, नागरिकांनी प्रशासनाकडून तांदूळ, गहू, जेवण तसेच जनावरांना चारा व पिण्याचे पाणी ही आवश्यक मदत मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, शेती पिकाच्या नुकसानीबाबत पंचनाम्यांची कार्यवाही लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. माढा तालुका प्रशासनाने घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी १० हजार रूपये मदत रक्कम जमा केली आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले तसेच तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.