धक्कादायक; मुलगा खाली डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स शोधायला गेला.. तोपर्यंत आईने प्राण सोडला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:39 PM2020-07-30T12:39:54+5:302020-07-30T12:43:45+5:30

सोलापुरातील क्वारंटाईन सेंटरमधील घटना; उपचाराविना सोलापुरातील महिलेचा मृत्यू

Shocking; The boy went to see the doctor, here the mother died! | धक्कादायक; मुलगा खाली डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स शोधायला गेला.. तोपर्यंत आईने प्राण सोडला...

धक्कादायक; मुलगा खाली डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स शोधायला गेला.. तोपर्यंत आईने प्राण सोडला...

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाने ३५० नागरिकांची तपासणी करण्यासाठी केवळ एका डॉक्टरची नेमणूक केलीरेणुका नल्ला यांचा मृतदेह कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले नल्ला कुटुंबीयांना दुरूनच अखेरचे दर्शन घ्यायला सांगण्यात आले

सोलापूर : मला क्वारंटाईन सेंटरमध्ये श्वास घ्यायला त्रास होतोय. डॉक्टर बघत नाहीत, गोळ्या-औषधं देत नाहीत. मला इथून घेऊन जा, नाहीतर मारून टाक... असा टाहो आईने आपल्या मुलासमोर फोडला. मुलगा खाली डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स शोधायला गेला. तोपर्यंत आईने प्राण सोडला...

महापालिकेच्या वालचंद महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये बुधवारी सकाळी रेणुका नल्ला या महिलेचा उपचाराविना मृत्यू झाला. रेणुका यांचे पुत्र लक्ष्मण यांनी घडला प्रकार कथन केला. ते म्हणाले, आईला तीन दिवसांपासून श्वास घेताना दम लागायचा. क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगले जेवण मिळत नाही म्हणून मी घरातून जेवण आणून द्यायचो. येथील डॉक्टर काजल कोडिटकर यांना आईच्या प्रकृतीबद्दल सांगायचो तर त्या व्यायाम करायला सांगा. दोन-तीन दिवसांत कमी होईल म्हणून सांगायच्या. बुधवारी सकाळी आठ वाजता मी चहा द्यायला आलो तर आईला फारच त्रास होत होता. डॉक्टर कोडिटकर यांना फोन केला तर त्यांनी दहा वाजता आल्यानंतर बघू, असे सांगितले. खाली थांबलेल्या वॉचमनने तर मी तुम्हाला फारशी मदत करू शकत नाही, असे सांगितले.

आमची मदत करायला महापालिकेचा एकही कर्मचारी, अधिकारी नव्हता. पुन्हा चार पायºया चढून वर खोलीत आईकडे गेलो तर आईने जीव सोडला होता. दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे शहराध्यक्ष गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक राजकुमार हंचाटे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जुबेर बागवान, युवराज पवार आदी क्वारंटाईन सेंटरमध्ये आले. सेंटरमधील लोक ऐकायला तयार नव्हते. पोलीस आणि नगरसेवकांनी या नागरिकांची समजूत काढायचा प्रयत्न केला. लोक समस्या मांडतात तेव्हा दुर्लक्ष करतात. अंगावर येतात तेव्हा आम्हाला पुढे का करता, असा सवालही धुत्तरगावकर यांनी केला.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
रेणुका नल्ला यांचा मृतदेह कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले. त्यामुळे नल्ला कुटुंबीयांना दुरूनच अखेरचे दर्शन घ्यायला सांगण्यात आले. कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णाची स्वॅब टेस्ट घेतली नाही म्हणून पालिकेने एका खासगी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता मनपाच्या डॉक्टरांवर कारवाई होईल का?, असा सवालही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष
मनपाने ३५० नागरिकांची तपासणी करण्यासाठी केवळ एका डॉक्टरची नेमणूक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवू नका. त्यांना रुग्णालयात किंवा विशेष निगराणीखाली ठेवा, अशी मागणी आम्ही पूर्वीपासून करतोय तरी त्याकडे दुर्लक्ष केले गेले. वरिष्ठ अधिकाºयांवर सेंटरच्या देखरेखीची जबाबदारी आहे. बुधवारी घटना घडल्यानंतर तीन वरिष्ठ अधिकारी पळत आले. यापूर्वी किमान एकाने नियमित भेट दिली असती तरी रेणुका नल्ला यांचे प्राण वाचले असते.

खासगी रुग्णालयात जातो म्हटले तरी सोडले नाही..
रेणुका नल्ला यांचा त्रास वाढत असल्याने लक्ष्मण आणि नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी मंगळवारी सकाळी क्वारंटाईन सेंटरमधील डॉक्टरांची भेट घेतली होती. आम्ही आईला खासगी रुग्णालयात दाखल करतो. त्यांना जायची परवानगी द्या, अशी विनंती केली. परंतु, सोडता येणार नाही असे सांगण्यात आले.

Web Title: Shocking; The boy went to see the doctor, here the mother died!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.